मुंबई : भीमा कोरेगाव येथील झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्रात काही बाहेरचे लोक येऊन जातीवादाचे मुद्दे मांडत आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर केली आहे. भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यभरात ज्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. त्या ठिकाणची चौकशी करण्यात येणार आहे. हिंसक घटनांच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. या पडताळणीअंती योग्य अशी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र बंद अखेर मागेभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.