Join us

'देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'मध्ये सहभागी व्हावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 8:10 AM

चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले.

ठळक मुद्देचंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले.

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन, तसेच केंद्राकडून राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आदी मुद्द्यांवर शिरोमणी अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेशी शिवसेना सहमत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अकाली दलाचे नेते, खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेना शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही राऊत यांनी केलंय. 

चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. चंदूमाजरा म्हणाले की, शेतकरी आणि सरकारमधील चर्चा यशस्वी व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांशी चर्चा न करताच हे कायदे बनविले आहेत. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, संजय राऊत यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याचे सांगितले. देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला शिवसेनेचं समर्थन आहे. शेतकरी आपला अन्नदाता असल्याने त्यांच्याप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळेच देशातील जनतेनं स्वयंस्फूर्तीनं शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जय हिंद.. असे ट्विट संजय राऊत यांनी केलंय.  

दिल्ली सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीआंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या शेतकरी आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून काँग्रेसनंतर आता शिवसेननंही पाठिंबा दर्शवलाय.  

राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याचा त्रास पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोन स्टेन हृदयात टाकण्यात आले आहेत. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्त्वाखाली संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतशेतकरीआंदोलन