Join us

टाटा हॉस्पिटलच्या ऋणातून उतराई होण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 10:19 AM

बरे झालेले करत आहेत रुग्णालयात येऊन इतरांना मदत.

संतोष आंधळे, मुंबई : बालपणीच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी यशस्वी लढा देऊन जीवनाचा पुन्हा श्रीगणेशा करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यांना नवी उभारी देण्यात टाटाहॉस्पिटलचा मोठा सहभाग आहे. हॉस्पिटलच्या या ऋणाचे उतराई होण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. मग येथे येणाऱ्या बालरुग्णांचे कोणी समुपदेशन करते, तर कोणी त्यांना नृत्य शिकवते, तर अशा १४ जणांचा येत्या जागतिक बाल कर्करोग दिनाच्या निमित्ताने टाटा हॉस्पिटलतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. 

कर्करोगावर उपचार घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण येत असतात. दरवर्षी सरासरी दोन हजार लहान मुले असतात. या बालरुग्णांना उभारी देण्याचा प्रयत्न हॉस्पिटलकडून केला जातो. आधीच कर्करोगावरील उपचारांमुळे त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बेतास बात झालेली असते. उपचारातून खडखडीत बऱ्या झालेल्या बालरुग्णांना पुढे भविष्यात अडचण येऊ नये, या मिषाने टाटा हॉस्पिटलकडून विशेष कक्ष चालविला जातो. या विभागाच्या समन्वयक आणि कर्करोग तज्ज्ञ डॉ.माया प्रसाद सांगतात की, कर्करोगावर दोन-तीन वर्षे उपचार घेऊन अनेक मुले बरे होतात. त्यानंतरही अनेक रुग्ण विविध आजारांच्या निमित्ताने  कक्षाला भेट देत असतात. लहानपणी १० ते १५ वर्षांचे असताना उपचारासाठी नोंदणी झालेले रुग्ण वयाच्या ४५ ते ५० वयांपर्यंत आरोग्याच्या अन्य मदतीसाठीही या ठिकाणी येत असतात. 

या कक्षाला १४ जण नियमित मदत करतात. त्यात कोणी कथ्थक नृत्य विशारद आहे, तर कोणी विज्ञान शाखेतील पदवीधर, तर कोणी आयटी तज्ज्ञ. यातील प्रत्येक जण येथे येऊन उपचार घेणाऱ्या मुलांना नृत्याचे धडे देतो, कोणी नातेवाइकांचे समुपदेशन करतो वा इतर तांत्रिक कामांत मदत करतात. चौथीत शिकणारा मुलगा तर मुलांच्या कर्करोगावर जनजागृतीचे काम करत आहे. काही जण तर आठवड्यातून दोन वा तीन दिवस येथे येऊन वॉर्डमध्ये मदतनिसाचे काम करतात. या सर्वांना पुढील आठवड्यात सन्मानित करण्यात येणार आहे. 

सगळ्या लहान मुलांना उपचारात मदत करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे  इम्पॅक्ट फाउंडेशनची स्थापना २००९ पासून करण्यात आली. या संस्थेला सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त होतो. त्यातून या सर्व मुलाचा खर्च केला जातो. दरवर्षी २,००० मुलांना मदत करण्यात येते. यासाठी वर्षाकाठी ४० ते ४५ कोटी खर्च करण्यात येतो.  यामध्ये या मुलांना रुग्णालयात उपचार, राहणे त्याशिवाय परत घरी जाणे, त्यांचे शिक्षण, नोकरी लागेपर्यंत सर्व मदत करण्यात येते. त्यापैकी काही जण रुग्णालयाला मदत करण्यासाठी येत असतात. - शालिनी जाटिया, कक्ष प्रमुख, इम्पॅक्ट फाउंडेशन, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल.

टॅग्स :मुंबईटाटाहॉस्पिटल