Join us

उत्तर प्रदेशात जनतेनं बेरोजगारी अन् महागाईपेक्षा भाजपावर विश्वास ठेवला- अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 1:42 PM

भाजपाला यश मिळालं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ४-१ अशी खणखणीत बाजी मारली. पंजाबात मात्र आम आदमी पक्षाची अक्षरश: त्सुनामी आली. त्यात काँग्रेस, भाजप आणि अकाली दल हे सर्व पक्ष वाहून गेले. उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्याची किमया तब्बल ३७ वर्षांनी साधली आहे. 

भाजपाच्या यशावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यातील निवडणुका झाल्या आहेत. जनतेने कौल दिला त्याचा नक्कीच आदर आहे. भाजपाला यश मिळालं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.   उत्तरप्रदेशात एकाच पक्षाला वीस वर्षानंतर लागोपाठ सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली होती. याचाही परिणाम झाल्याचं दिसून येत असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशच्या राजकारणात विरोधकांनी बेरोजगारी, महागाई किंवा कोरोनाच्या काळात झालेली हेळसांड याकडे लक्ष वेधण्याचा जास्त प्रयत्न केला होता. पण उत्तर प्रदेशच्या जनतेने या मुद्द्यांपेक्षा भाजपावर विश्वास ठेवला, असंही अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या ८० जागा वाढल्या असून शंभरीचा आकडा पार केला आहे. अखिलेश यादव यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे ज्या प्रकारे मुसंडी मारली आहे. प्रियांका गांधी यांच्या रोड शोला जो प्रतिसाद, गर्दी झाली. ही भविष्यकाळातील चुणूक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर होणारी टीका पाहता त्यांचे समर्थक समर्थनासाठी पुढे आले आहेत. ग्रुप-२३चा कोणताही नेता हल्लाबोल करण्यापूर्वीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. त्या बैठकीत राहुल यांच्याबाबतची नाराजी निघून जावी, असा त्या मागील उद्देश आहे.

काँग्रेसचे मोठे नेते हल्लाबोल करण्याच्या तयारीत-

काँग्रेसचे अनेक मोठे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. याच साखळीत सर्वांत पहिला हल्ला पक्षाचे खा. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुका हारत चालली आहे. परंतु २०१४ नंतर झालेल्या पराभवांपासून आम्ही कोणताही धडा शिकलेलो नाहीत. 

पक्षाला आत्मचिंतन करण्याबरोबरच संपूर्ण पक्षात नवीन बदल करण्याची गरज आहे. सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडेच होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले ए. के. अँटोनी यांनी तर दुखी होऊन कोणताही हल्लाबोल केल्याशिवाय सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजकारणातून संन्यास घेतला. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीभाजपाउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२