मंदिरात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळतं; रोहित पवारांची साई संस्थानवर टीका
By मुकेश चव्हाण | Published: December 10, 2020 04:27 PM2020-12-10T16:27:09+5:302020-12-10T16:27:37+5:30
साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थान केले आहे.
मुंबई: साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन शिर्डीतील साई संस्थानने केले आहे. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. मात्र या नियमावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी साई संस्थानच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. याचदरम्यान साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मात्र, तरीही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे साई संस्थानवर टीका केली आहे.
तत्पूर्वी, तृप्ती देसाई यांनी साई संस्थानाच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर ब्राम्हण महासंघाने आक्रमक होत साई संस्थानाची भूमिका योग्य असल्याचे सांगितले होते. तृप्ती देसाई शिर्डीत आल्यास आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्यांनी पोलिसांनी बंदीची नोटीस पाठवली होती. परंतु नोटीस पाठवलेली असतानाही शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे-अहमदनगर मार्गावरील सुपे टोल नाक्यावर तृप्ती देसाई यांचा ताफा पोलिसांनी अडवला.
शिर्डीच्या १०० किमी आधीच पोलिसांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी तृप्ती देसाई समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. "आम्ही आमच्या हक्काने अधिकारासाठी लढत आहोत. आज मानवी हक्क दिन आहे आणि त्याच दिवशी आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय हे दुर्दैवी आहे", असं तृप्ती देसाई म्हणाल्या. याशिवाय, "नगर पंचायतीच्या आदेशानुसार पोलिसांनी जर मला शिर्डीत बंदीची नोटीस धाडली आहे. तर पोलिसांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी इथंच थांबून त्यांनी माझ्या सहकाऱ्यांना शिर्डीत जाऊ द्यावं", असंही तृप्ती देसाई यांनी सांगितलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
"साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये", असे आवाहन साई संस्थान केले आहे. यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमाचे फलक लावले आहेत. देसाई यांनी साई संस्थानने लावलेले हे फलक हटविण्याची मागणी केली आहे. साई संस्थानने फलक काढला नाही, तर आपण स्वत: जाऊन फलक हटविण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुरक्षेच्या कारणास्तव ८ ते ११ डिसेंबरमध्ये शिर्डीत प्रवेश बंदीची नोटीस पाठवली होती. तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावत आज शिर्डीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं.