मस्त जगणारी माणसं मस्तीत जगणाऱ्यांचे बळी ठरतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:00 AM2018-12-08T01:00:07+5:302018-12-08T01:00:13+5:30
काही आपल्या जगण्यावर प्रेम करतात, तर काही जण आपल्या संपत्तीवर प्रेम करतात. काहींना इतरांसाठी जगावे, असे वाटते तर काहींना इतरांनी आपल्यासाठीच जगावे, असे वाटते.
- विजयराज बोधनकर
काही आपल्या जगण्यावर प्रेम करतात, तर काही जण आपल्या संपत्तीवर प्रेम करतात. काहींना इतरांसाठी जगावे, असे वाटते तर काहींना इतरांनी आपल्यासाठीच जगावे, असे वाटते. काहींचे आयुष्य एखाद्या बहरलेल्या झाडासारखे असते, कुणाचं आयुष्य सुकून गेलेल्या झाडासारखे असते. जगण्याजगण्यातील दुजेपणा कशामुळे निर्माण होतो, तर त्याचं सोप उत्तर ते म्हणजे आपले विचार आणि त्यानुसार अवलंबलेला आचार. याचमुळे काही जण मस्त आयुष्य जगतात, तर काही मस्तीत जगतात. काहींना दु:ख गोचिडासारखं झोंबत असतं, तर काहींना आयुष्य जिभेवरच्या अवीट चवीसारखं भासत राहतं. प्रत्येकाचे बालपण हेसुद्धा सुखदु:खाला कारणीभूत असतं. त्याच पायावर उभं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतं. दु:खाला मनात ज्याने कायमचं स्थान दिलेले असते, त्याला सुखाचा चहासुद्धा नशिबी येत नाही आणि दु:खातही ज्याने इतरांना हसवून आपलं दु:खी आयुष्य व्यतीत केलेलं असतं, त्याला आयुष्य हे कायमचं एखाद्या फुललेल्या निशिगंधासारखं वाटत राहतं.
गाव आणि शहर हे भिन्न रंगरूपाचे अधिष्ठान असते. यात कुणी फक्त शहरीच बनते आणि गावाकडे फक्त तिरकस नजरेने पाहते. त्याला कुठल्या तरी विचारांची विषबाधा झालेली असते. गावात राहून शहरासारखं जगण्याचा खोटा प्रयत्न करणाराही कुठेतरी न्यूनगंडाचा गुलाम बनत गेलेला असतो. गावशहर, सुखदु:ख, गरीबश्रीमंत अशा फरकानुसार जो माणसांकडे पाहतो, तो विचारांची मोठी गफलत करत असतो. ज्याला उदात्त विचार करण्याची सतत सवय लागलेली असते, अशा जीवांना सर्वत्र समताच दिसत असल्यामुळे त्याला उच्चनीच भेदभाव कुठेच दिसत नाही. ती माणसं अहंकाराचे गुलाम बनत नाही. मुक्त आनंद यात्री बनून सर्वत्र आनंद वाटताना दिसतात. अशी माणसं जेव्हा कोणत्याही अधिकाराच्या पदावर असतात, तेव्हा ती सर्वार्थाने समतेने सर्वाचं भलं करण्याचा प्रयत्न करतात. गावाला अधिक सक्षम आणि शहराला प्रगत बनवण्याचा प्रयत्न करतात. गावातील आणि शहरातील माणसांमध्ये ते कधीच भेदभाव करत नाहीत. पदाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करतात, अशी माणसं समाजाच्या नजरेत देवासमान असतात. अशी माणसं जिथे जातील, तिथे सुगंधाचा शिडकावा करत सुटतात. म्हणूनच, शासनाच्या अधिकारपदी अशी माणसं असलीत की, त्यांची सतत उचलबांगडी होत असते.
याउलट, असतात ती मस्तीत जगणारी माणसं. मस्त जगणारी माणसं मस्तीत जगणाऱ्यांचे बळी ठरतात. परंतु, मस्त जगणाºयांचा सुगंध सहजपणे सर्वत्र पसरलेला असतो. संत तुकोबांनी आयुष्य मस्त जगण्याचा प्रयत्न केला, पण मस्तीत जगणाºयांनी त्यांना पुष्पक विमानाचा रस्ता दाखवला. मात्र, तुकाराम महाराज अजरामर झालेत. त्यामुळे आयुष्य मस्तीत, मजेत, गर्वात नाही तर सहज, सुंदर, चांगला विचार, दृष्टी ठेवून मस्तपणे जगण्याचा प्रयत्न करा.