काय सांगता? रेल्वे सुरक्षा हेल्पलाइनवर चक्क समोसा, पिझ्झाची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:25 AM2024-02-06T10:25:05+5:302024-02-06T10:26:01+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने १८२ हेल्पलाइन सुरू केली आहे.
मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने १८२ हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर फोन करून काही जण एक समोसा व पिझ्झाची ऑर्डर देत होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाइन क्रमांकावर अशा प्रकारच्या ऑर्डर्सनी सध्या सुरक्षा दलाच्या जवानांना वैताग आणला होता. मात्र १३९ हेल्पलाइन सुरू केल्यानंतर अशा अनावश्यक कॉल सुरूच आहेत.
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)च्या हेल्पलाइन क्रमांक १८२ ची सुरुवात केली होती. या हेल्पलाइन क्रमांकावर जवळपास ७० टक्के बनावट कॉल्स येत होते. या कॉल्सच्या माध्यमातून रेल्वे हेल्पलाइनवर समोसा, बर्गर, पिझ्झाची ऑर्डर देण्यात येत होती. रेल्वेची मदत हवी असल्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या १३९ या टोल फ्री नंबरला कॉल केल्यास मदत मिळते. परंतु पूर्वी रेल्वेमध्ये मदतीसाठी वेगळा क्रमांक, तक्रारींसाठी भिन्न क्रमांक आणि चौकशीसाठी वेगळाच नंबर, अशी अवस्था होती. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र रेल्वे प्रवाशांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आता ही एकमेव ९३९ हेल्पलाइन असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणाशीही संपर्क करण्याची गरज नाही.
कॉल्स सुरक्षेशिवाय :
१३९ हा क्रमांक सुरक्षेसाठी आहे. गेल्या वर्षभरात आलेल्या एकूण कॉल्सपैकी २५ टक्के कॉल्स सुरक्षेशिवाय कारणांसाठी आले आहे. यामध्ये माझी गाडी कुठे आली, पिझ्झा, समोशासाठीचे आहेत. पूर्वी हे प्रमाण ७० टक्के होते. त्यामध्ये आता घट झाली आहे.
हेल्पलाइनवर कुठली मदत मिळणार?
मौल्यवान वस्तू गहाळ अथवा चोरीला गेले, सह प्रवासी त्रास देत असतील, छेडाछाड किंवा मारहाणीची घटना, प्रवासात प्रकृती खराब झाल्यास मदतीसाठी १३९ हेल्पलाईनवर फोन करावा. मदतीसाठी आरपीएफचे जवान, रेल्वे पोलिस, टीसी किंवा डॉक्टर मदतीसाठी त्वरित पुढील स्थानकांमध्ये दाखल हाेता.