मुंबई : सीएए, एनआरसी, सीआयआय कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलकांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ मरिन लाइन्स चौपाटीवर सोमवारी मध्यरात्रीपासून निदर्शने करण्यात आली. गेटवे आॅफ इंडियावर काढण्यात येणारा कॅण्डल मार्च रोखल्याने तेथे आंदोलकांनी केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मंगळवारी दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे ३५ जणांविरुद्ध विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीत गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शांततेने आंदोलन सुरू आहे. सोमवारी सकाळी उजव्या विचारसरणीच्या आणि कायद्याला समर्थन देणाऱ्या संघटनांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्याला विरोधी बाजूंनीही प्रतिकार करण्यात आल्याने मोठा हिंसाचार झाला असून, ७ जणांचा मृत्यू तर कोट्यवधीच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. दिल्ली पोलीस याबाबत बघ्याची भूमिका घेत हल्लेखोरांना मदत करीत असल्याचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. त्याविरोधात गेटवे आॅफ इंडियावर ‘कॅण्डल मार्च’ काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला बंदी घालून सर्व रस्ते अडविले. आंदोलक मरिन ड्राइव्ह चौपाटीवर सुंदरमल जंक्शनजवळ एकत्र जमले. आंदोलक गटागटाने रात्रीपासून दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून होते.मुंबई पोलिसांच्या विरोधाला न जुमानता आंदोलकांनी निदर्शने केल्याने तसेच सार्वजनिक शांतता भंग, कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याने कलम ३७(१), (३)१३५ कायद्यान्वये ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले.
कॅण्डल मार्च रोखल्याने मरिन लाइन्स चौपाटीवर रात्रभर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 4:10 AM