सांताक्रूझ-खारमधील ‘त्या’ ९५०० घरांचा पुनर्विकास कधी? मतदारांची निषेधाची पत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:34 AM2024-03-27T10:34:27+5:302024-03-27T10:35:30+5:30
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सांताक्रूझ-खार येथील संरक्षण दलाच्या जमिनीवरील ९५०० घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
श्रीकांत जाधव, मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील झोपडपट्टीचा पुनर्विकास रखडल्याने येथील मतदारांनी मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला टाळून भाजपला मतदान केले. मात्र, गेल्या १० वर्षांत खासदार पूनम महाजन यांनी संरक्षण दलाच्या जमिनीवरील घरांचा प्रश्न सोडविला नसल्याने त्याच्याविरोधात नाराजी दर्शवणारी पत्रके मराठा कॉलनी, डवरीनगर, गोळीबार परिसरात लावण्यात आली आहेत. आता तिसरी निवडणूक आली तरी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सांताक्रूझ-खार येथील संरक्षण दलाच्या जमिनीवरील ९५०० घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
आम्हाला जगणे कठीण -
या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी घोषित होण्यापूर्वीपासूनच मतदारांकडून नाराजीचा सूर आहे. केंद्राकडून राज्य सरकारला संरक्षण दलाच्या जमिनीबाबत ना-हरकत पत्र मिळाले नसल्याने सांताक्रूझ, खार रहिवाशांचा पुनर्विकास रखडला आहे. बकाल झोपडपट्टीत आम्हाला जगणे कठीण झाले आहे.
‘एनओसी’अभावी खोडा?; चाळींची दुरवस्था-
१) उत्तर मध्य मुंबईत मराठा कॉलनी, गोळीबार, डवरीनगर भागात गेल्या ६० वर्षांपासून लाखो रहिवासी राहत आहेत. शासकीय सर्वेक्षणानुसार संरक्षण दलाच्या जमिनीवर ९,५०० घरे आहेत.
२) आजूबाजूच्या पुनर्विकासाची कामे जोरदार सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारची ‘एनओसी’ नसल्याने पुनर्विकास रखडला आहे. विकास होत नसल्याने चाळींची दुरवस्था आहे.
३) घर खरेदी-विक्री, बांधकाम व्यवहार रखडले आहेत. येथील ९,५०० घरांचे नेमके काय होणार? पुनर्विकास कधी होणार? याचे उत्तर लोकप्रतिनिधी देत नाहीत.
उत्तर मध्य मुंबईतील संरक्षण जमिनीवरील घरांच्या प्रश्नासाठी भाजपने सर्वात पहिले प्रयत्न केले. खासदार पूनम महाजन यांनी केंद्रातील मंत्र्यांशी बैठका घेतल्या. बायोमेट्रिक सर्वेक्षण करून घेतले. आता हा विषय संरक्षण दल आणि रेल्वेच्या अखत्यारित असल्याने थोडा उशीर झाला आहे. - सुशाम सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप
१) २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पुनर्विकासाचे आश्वासन देऊन आमची मते घेतली. आता १० वर्षे झाली, तरी अद्याप निर्णय झालेला नाही. खासदार महाजन यांनी सभागृहात विषयही मांडलेला नाही. निवडून आल्यावर सहा महिन्यांत ना-हरकत पत्र मिळवून देईन, असे आश्वासनांचे केवळ फलक लावण्यात आल्याचे सांताक्रूझ येथील ‘माझे घर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विनोद रावत यांनी सांगितले.
२) आधीच वर्षोनुवर्षे पुनर्विकास रखडला आहे. अशात कालिना विद्यापीठ येथून उड्डाणपूल येथे प्रस्तावित आहे. त्यामुळे खार, सांताक्रूझ परिसरातील रहिवासी आपले राहते घर आणि विभाग सोडावा लागणार की काय? अशा चिंतेत आहे. उड्डाणपुलाला स्थानिकांचा विरोध आहे. मात्र त्याची टांगती तलवार असल्याने मराठा कॉलनी, डवरी नगर, गोळीबार परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.