मुंबईकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यात देशातील गरिबांना मोफत लस देण्यात यावी यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. पण गरिबांवर लसीकरणाचा ५०० रुपयांचा खर्च लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्राकडे गरिबांना लस मोफत देण्यात यासंदर्भातील मागणी करणार आहे. जर केंद्राने तसे केले नाही. तर राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही", असं सांगत राजेश टोपे यांनी मोफत लस देण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'ड्राय रन'राज्यात येत्या ८ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात २ जानेवारी रोजी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ड्राय रन होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण येणार नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
नव्या स्ट्रेनचे राज्यात ८ रुग्णमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हे आठही जण ब्रिटनहून आल्याचंही ते म्हणाले. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा विषाणून वेगाने पसरतो असं पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पण घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मुंबई लोकलचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर"लोकल ट्रेन असो किंवा नाइट कर्फ्यू, या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच होईल. कारण या संदर्भातील सर्व आकडे आणि माहिती थेट मुख्यमंत्र्यांना दैनंदिन पातळीवर देण्यात येते. त्यामुळे योग्य वेळी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय जाहीर करतील", असं राजेश टोपे म्हणाले.