Join us

2014 मध्ये जनतेची फसवणूक झाली- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 5:39 AM

उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर शरसंधान

मुंबई: गेल्या निवडणुकीतील जनमताचा कौल ही जनतेची चूक नव्हती, तर जनतेची फसवणूक होती, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. गुजरातमध्ये पाच हजार शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. हेच का तुमचं विकासाचं मॉडेल, असा सवाल उपस्थित करत उद्धव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी विविध विषयांवरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली.गेल्या चार वर्षांपासून भाजपावर वारंवार टीका करणारी शिवसेना सत्तेत का सहभागी झाली, याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत भाष्य केलं. 'त्यावेळी आम्ही सत्तेत सहभागी नसतो झालो, ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी राज्ये जिंकत चाललीय, वाट्टेल त्या पद्धतीनं.. जसे त्रिपुरामध्ये काँग्रेस, तृणमूल पक्ष फोडूनच राज्य स्थापन केलं, तसं महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पैशाचा वापर वाढला आहे, याबद्दल बोलतानाही उद्धव ठाकरेंनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रत्येक निवडणूक पैशाचा आणि सत्तेचा वापर करुनच जिंकायची असते असं चाणक्यानं म्हटलंय का?, असा प्रश्न उपस्थित त्यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मोदींना चाणक्य म्हटलं होतं. मी सत्ताकारणासाठी पैशाचा वापर करणार नाही, असंही ते म्हणाले.   

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपाशिवसेनालोकसभा