४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 09:56 AM2023-12-29T09:56:54+5:302023-12-29T09:57:36+5:30

हक्काचे घर मिळालेल्यांनी संक्रमण शिबिरातील आठवणींना दिला उजाळा.

people who got the mhada house gave light to the memories in mumbai | ४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा

४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा

मुंबई : मुसळधार पावसात कोणाची इमारत कोसळली होती, तर पुनर्विकासादरम्यान येणाऱ्या जागेच्या अडचणींमुळे काहींना घरे मिळाली नव्हती, अशा रहिवाशांना म्हाडाने तत्काळ संक्रमण शिबिर उपलब्ध करून देत त्यांचे पुनर्वसन केले होते. याच रहिवाशांना संक्रमण शिबिरातून हलवत नवीन घर देण्यासाठी मास्टर लिस्ट तयार केली होती. यासाठी गुरुवारी म्हाडा मुख्यालयात  ४४४ घरांसाठी २६५ अर्जदारांची लॉटरी काढण्यात आली. वीस ते चाळीस वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहत असलेल्या रहिवाशांना हक्काचे घर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. संक्रमण शिबिरात कसे दिवस काढले, कसे जगलो, हे आम्हालास माहीत, हे सांगत संक्रमण शिबिरातील कटू आठवणींना उजाळा दिला. 

दुपारी एक नंतर म्हाडा मुख्यालयात काढलेल्या लॉटरीसाठी बहुतांशी अर्जदार हजर झाले होते. मास्टर लिस्टवरील रहिवाशांना यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घरे दिली जात होती. मात्र, यंदा पहिल्यांदा ही घरे देण्यासाठी ऑनलाइन लॉटरी राबविण्यात आली. एकूण सहा टप्प्यांमध्ये ही लॉटरी घरांच्या चौरस फुटाच्या आकारमानानुसार काढण्यात येत असतानाच उपस्थित रहिवाशांमध्ये देखील या लॉटरीचे कुतूहल होते. सर्वसाधारण नागरिकांसाठी ज्या पद्धतीने लॉटरी काढली जाते, त्याच पद्धतीने ही लॉटरी काढण्यात आली असली तरीदेखील मास्टर लिस्टसाठी ही पहिली लॉटरी असल्याने अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेदेखील लॉटरी पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

ऑनलाइन लॉटरी काढण्याचा कालावधी सुमारे तासभर चालला असला तरीदेखील मुख्यालयाच्या परिसरात संध्याकाळी उशिरापर्यंत या लॉटरीमधील विजेत्या अर्जदारांची नावे पाहण्यासाठी रहिवासी दाखल होत होते.

१९७८ या वर्षी आमची बिल्डिंग पडली. म्हाडाने आम्हाला सायन येथील संक्रमण शिबिरात घर दिले.  आता मास्टर लिस्टच्या माध्यमातून घरे देण्याचा उपक्रम ऑनलाइन हाती घेतला आहे, याचा आनंद आहे. आम्हाला दादर येथे घर मिळाले आहे. - दीपक शहासने 

मी बोरिवली येथे राहायला होते. संक्रमण शिबिरात आम्ही वीस वर्षे काढली. आता कुंभारवाडा येथे ३०० चौरस फुटाचे घर मिळाले आहे. नवीन घर मिळावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. उशिरा का होईना म्हाडाने मास्टर लिस्ट काढत नवीन घर दिले याचा आनंद आहे.- पूजा शिरकर 

मुंबईत २६ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. म्हाडाने आम्हाला बोरीवली येथील संक्रमण शिबिरात घर दिले होते. त्यांनतर आता म्हाडाने जी मास्टर लिस्ट काढली, त्या माध्यमातून नवीन घर मिळावे यासारखा दुसरा आनंद नाही - अवधूत साळवी

Web Title: people who got the mhada house gave light to the memories in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.