तुम्हाला आनंद मिळेल, पण ‘सीगल’चे आरोग्य बिघडेल; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:01 AM2024-02-20T10:01:11+5:302024-02-20T10:04:58+5:30
गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटीने प्रवास करणाऱ्यांना प्रवासात हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे समुद्रातील पांढरे शुभ्र सीगल पक्षी.
मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटीने प्रवास करणाऱ्यांना प्रवासात हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे समुद्रातील पांढरे शुभ्र सीगल पक्षी. प्रवासादरम्यान पर्यटनासाठी अलिबाग येथे येत असणारे प्रवासी आवडीने चिप्स, गाठिया हे खाद्यपदार्थ या पक्ष्यांना खाऊ घालत असतात, त्यांना त्याचा आनंद मिळत असतो. मात्र त्यामुळे हे या पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकते याचे भानही त्यांना राहत नाही. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे पक्ष्यांचे खाद्य नसून यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
पक्ष्यांना अशा पद्धतीने खाद्यपदार्थ देऊ नयेत, असे आवाहन करूनही प्रवासी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या ४५ ते ५० मिनिटांच्या या प्रवासात अनेक प्रवासी बोटीच्या डेकवरून जाऊन बोटमधील खाद्यपदार्थ विकत घेऊन पक्ष्याच्या दिशेने भिरकावत असतात. तसेच त्या खाद्यपदार्थाच्या प्लास्टिकच्या पुड्या समुद्रात फेकत असतानाचे चित्र कायमचे झाले आहे. त्या पक्ष्यांना पदार्थ खाऊ घालताना छायाचित्र काढण्यासाठी मोठी झुंबड उडालेली असते. या बोटीमधून असे खाद्यपदार्थ विक्रीची बंदी घातली पाहिजे, असे मत पक्षिप्रेमीमधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने गेटवे ऑफ इंडिया, मांडवा जेट्टी या दोन्ही ठिकाणी मोठे फलक लावून अशा पद्धतीने पक्ष्यांना खाऊ घालू नये, अशा सूचनांचा फलक लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बोटीमधून असे खाद्यपदार्थ विक्री कायम स्वरूपाची बंदी घातली पाहिजे, असे मत पक्षिप्रेमीमधून व्यक्त होत आहे.
या पक्ष्याचे थवे त्या बोटींसोबत जात असतात. चुकीचे खाद्यपदार्थ दिल्याने पक्ष्याच्या जीवावर बेतू शकते.
या पक्ष्याचे थवे बोटींसोबत जात असतात. बोटीमधून असे खाद्यपदार्थ विक्रीची बंदी घातली पाहिजे.
सीगल या पक्ष्यांना समुद्रातील लहाने मासे वेचून खाण्याची सवय आहे. परंतु त्यांना तेलकट पदार्थ खाण्याची नागरिक सवय लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या मासे वेचून खाण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम होत आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या यकृतावर, पचन संस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजगृती करण्याची गरज आहे. नागरिक पक्ष्यांवर प्रेम करतात याचा मला आदर आहे. मात्र या अशा चुकीचे खाद्यपदार्थ दिल्याने त्यांच्या जीवावर बेतू शकते. - डॉ. प्रदीप चौधरी, कॅन्सर पशुवैद्यकीय तज्ज्ञ, टाटा हॉस्पिटल