मुंबई : लोकशाहीवर झालेला हल्ला जनता खपवून घेणार नाही. लोकशाही टिकण्यासाठी पाहिजे ती किंमत आम्ही मोजू. जनता हुशार असते. तिला फार काळ फसवता येत नाही. प्रा. मधु दंडवते यांनी दाखवलेला सर्वसमावेशक लोकशाही मार्ग महत्त्वाचा असून त्यावरून चालताना कितीही अडचणींचा सामना करावा लागला तर आपणाला एकत्र राहावे लागेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
भारताचे माजी अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे, त्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी.जी. पारीख होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले, खा. कुमार केतकर, कर्नाटकचे मंत्री बी.आर. पाटील, मेधा पाटकर, शेकापचे जयंत पाटील, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो आदी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते.
...तर आज ही वेळ आली नसती : अब्दुल्लाकार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. सत्तेत असताना योग्य न्यायाधीश नेमले असते, ईव्हीएम मशीन आणल्या नसत्या, त्याचबरोबर निवडणूक आयोगही स्वतंत्ररीत्या मजबूत केला असता तर आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकार काळातील काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली.
कोकणातील रेल्वे प्रश्नाबाबत ठरावया कार्यक्रमात कोकणातील रेल्वे प्रश्नाबाबत एक ठराव मांडण्यात आला, संपूर्ण सभागृहाने त्यास पाठिंबा दिला. कोकण रेल्वे ही मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी महाराष्ट्राला दिलेली अमूल्य अशी भेट आहे. कोकण रेल्वेचे स्वप्न श्री. अ.ब. वालावलकर आणि बॅ. नाथ पै यांनी पाहिले होते. दंडवते यांनी ते पूर्णत्वास नेले. कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्र सरकारने आपला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला, कोकणवासीयांनी आपल्या जमिनी दिल्या, कर्जरोखे उभे केले, तरीही महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त तुतारी आणि दिवा पॅसेंजर या दोनच ट्रेन उपलब्ध करून दिल्या गेल्या, अशी खंत प्रस्तावात मांडण्यात आली.