पालिकेचे लोका सांगे ब्रह्मज्ञान
By admin | Published: December 3, 2014 02:28 AM2014-12-03T02:28:24+5:302014-12-03T02:28:24+5:30
एकीकडे ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या ४२ टक्के सोसायट्यांना नोटीस बजावल्या असताना डम्पिंग ग्राउंडवर अद्याप कचरा एकत्रितच टाकला जात आहे़
मुंबई : एकीकडे ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या ४२ टक्के सोसायट्यांना नोटीस बजावल्या असताना डम्पिंग ग्राउंडवर अद्याप कचरा एकत्रितच टाकला जात आहे़ मात्र लोकांना ब्रह्मज्ञान शिकवणाऱ्या पालिका प्रशासनाचा प्रताप नगरसेवकांनीच उघड करताच सुका कचरा उचलण्याची वाहने आणि केंद्र वाढविण्याची धावपळ अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे़
ओला व सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने सफाई मोहिमेचे तीनतेरा वाजत आहेत़ या नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांना नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली़ मुंबईतील ३४ लाखपैकी ४२ टक्के निवासी सोसायट्या आणि ५३ टक्के व्यापारी गाळे, व्यावसायिक संकुलांना कचरा वेगळा करण्याची ताकीद देण्यात आली आहे़ त्यानुसार अडीच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो़
मात्र, हा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये वेगळा टाकण्याची व्यवस्था पालिकेकडे नाही़ तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात केवळ दोनच वाहने पुरविण्यात आली आहेत़ डम्पिंग ग्राउंडवरही कचरा एकत्रच टाकून पालिका नियम धाब्यावर बसवीत असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद लाभला नाही़ त्यामुळे स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे़ (प्रतिनिधी)