मुंबईतील मैदान, उद्यानांसाठी घेणार जनतेचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:31 AM2019-08-03T02:31:25+5:302019-08-03T02:31:31+5:30
नवीन धोरण आखणार : तात्पुरत्या धोरणाची ११ महिन्यांची मुदत संपली; सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
मुंबई : खासगी व राजकीय संस्थांकडे असलेली खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने महापालिकेने ताब्यात घेतली खरी. परंतु, यासंदर्भातील तात्पुरत्या धोरणाची ११ महिन्यांची मुदत संपल्यामुळे लवकरच नवीन धोरण आखण्यात येणार आहे. मात्र या वेळेस धोरणात कोणत्या त्रुटी राहू नयेत, यासाठी जनतेकडूनच सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
मोकळ्या भूखंडांसंदर्भातील नवीन धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर २१६ पैकी १८९ भूखंड महापालिकेने ताब्यात घेतले आहेत. अंतिम धोरण तयार होईपर्यंत ११ महिन्यांच्या करारावर भूखंडाची देखभाल करण्यास देण्याचे ठरले. नोव्हेंबर २०१७ मध्ये अमलात आलेल्या या धोरणाला दीड वर्ष उलटले आहे. त्यामुळे लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे.
मुंबईत एक हजार ६८ भूखंडांवर उद्याने, मैदाने व मनोरंजन मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे नियमितपणे केला जातो. या उद्यानांची व मैदानांची देखभाल ही स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्यासह अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी उद्यान विभागाने नागरिकांकडून सूचना, अभिप्राय व सल्ले आमंत्रित केले आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
येथे पाठवा अभिप्राय... : या धोरणाच्या प्राथमिक मसुद्याबाबत नागरिकांनी पाठविलेल्या सूचना पालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना, अभिप्राय, सल्ले इत्यादी पुढील १५ दिवसांत ई-मेलद्वारे किंवा उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकाऱ्यांच्या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत ७३७ उद्याने
मुंबईत ७३७ उद्याने आणि ३०५ खेळाची मैदाने आहेत. विकास नियोजन आराखड्यानुसार माणशी १.२८ चौ.मी. मोकळी जागा असणे अपेक्षित आहे. तर आदर्श नियमानुसार हे प्रमाण माणशी चार चौ.मी. असावे.