पालघरमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

By admin | Published: June 25, 2015 11:27 PM2015-06-25T23:27:25+5:302015-06-25T23:27:25+5:30

सातपाटी गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना गटाराच्या उभारणीसह योग्य नियोजन न आखल्याने म्हात्रेआळीच्या रस्त्यावर साचलेले पाणी तसेच

People's health question in Palghar | पालघरमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

पालघरमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

Next

पालघर : सातपाटी गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना गटाराच्या उभारणीसह योग्य नियोजन न आखल्याने म्हात्रेआळीच्या रस्त्यावर साचलेले पाणी तसेच राहते आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तत्काळ उपाययोजना न आखल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चाचे आयोजन करण्याचे इशारावजा निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
सातपाटीच्या म्हात्रेआळीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीने रस्ता काँक्रिटीकरण करण्याअगोदर गटाराची उभारणी न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते आहे. त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत. म्हात्रे आळी ते समता मंडळादरम्यान गटाराचे बांधकाम करण्याचा प्रयत्न काही माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध करून हाणून पाडल्याने म्हात्रेआळीमध्ये मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे.
हे साचलेले पाणी अनेक दिवस राहिल्यानंतर त्या पाण्याचा कुबट वास सर्वत्र पसरून त्यात डासांची उत्पत्तीही होत आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ यासंदर्भात उपाययोजना न आखल्यास या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सातपाटी ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे निवेदन ग्रामस्थांनी सरपंचांकडे दिले आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागेल. (वार्ताहर)

Web Title: People's health question in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.