Join us  

मेट्रो कारशेडविरोधात जनआंदोलन उभारणार

By admin | Published: March 14, 2016 2:14 AM

वांद्रे-कुलाबा-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरेमध्येच उभारण्याच्या निर्णयाला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पाठिंबा दर्शवला असताना ‘सेव्ह

मुंबई : वांद्रे-कुलाबा-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरेमध्येच उभारण्याच्या निर्णयाला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पाठिंबा दर्शवला असताना ‘सेव्ह आरे’ या संघटनेने कारशेडविरोधातील जनआंदोलन व्यापक करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केली.शनिवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्ट परिषदेत प्रकाश जावडेकर आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई एकाच व्यासपीठावर आले. या वेळी जावडेकर यांनी कारशेडला पाठिंबा दर्शवला; तर देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड उभारू देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे मेट्रोच्या कारशेडवरून दोन्ही पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले.मेट्रो कारशेडवरून राजकीय पक्षांमध्येच वाद सुरू झाल्याने, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी सकाळी आरे कॉलनीत ‘सेव्ह आरे’ या संघटनेची बैठक घेण्यात आल्याचे वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले. या बैठकीत जनआंदोलन आणखी व्यापक करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे यासंदर्भातील सर्वच मुद्द्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला असून, आंदोलनाचे स्वरूपही ठरवण्यात आले आहे. १९ मार्च रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, परिषदेत आंदोलनाची दिशा मांडण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण हरित लवादाकडे दाखल असताना लोकप्रतिनिधी यावर खुलेआम बोलत असल्याने स्टॅलिन यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.गोरेगाव येथील ‘नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष सुनील कुमरे यांनीही जावडेकर आणि देसाई यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले आहे. केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र असताना कारशेडवरून दोन्ही पक्षांत मतभेद का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कारशेडच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याऐवजी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. श्रेय घेण्यासाठी हा वाद सुरू झाल्याची टीका त्यांनी केली असून, यासंदर्भात किमान स्थानिकांची मते तरी विचारात घेण्यात यावीत, असेही म्हटले आहे.जनआधार प्रतिष्ठाननेदेखील मेट्रो कारशेडबाबत स्थानिक रहिवाशांची मते विचारात घेण्यात यावीत; या प्रमुख मुद्द्यावर जोर दिला. येत्या काही दिवसांतच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)रविवारी आरे कॉलनीत ‘सेव्ह आरे’ या संघटनेची बैठक घेण्यात आल्याचे वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले. १९ मार्च रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, परिषदेत आंदोलनाची दिशा मांडण्यात येणार आहे.जनआधार प्रतिष्ठाननेदेखील मेट्रो कारशेडबाबत स्थानिक रहिवाशांची मते विचारात घेण्यात यावीत; या प्रमुख मुद्द्यावर जोर दिला आहे.