बोरीवलीत झाडांना वाचविण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:04 AM2019-01-08T02:04:21+5:302019-01-08T02:04:39+5:30

महापालिकेच्या आर/मध्य विभागाच्या उद्यान अधिकारी साक्षी लाड यांनी सांगितले की, चारही नारळाच्या झाडांभोवती मातीचे कुंपन केले जाईल.

People's movement to save the trees in Borivli | बोरीवलीत झाडांना वाचविण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

बोरीवलीत झाडांना वाचविण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

Next

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर तीन अज्ञात व्यक्तींनी ड्रिलच्या माध्यमातून मुळापाशी छिद्र पाडून त्यात रासायनिक द्रव्याचा मारा केला. या प्रकरणी महापालिका, उद्यान प्रशासन आणि पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांना सोमवारी आंदोलन छेडले. ‘झाडे बचाव’ आंदोलनात स्थानिक रहिवाशांनी सहभाग घेत, महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

महापालिकेच्या आर/मध्य विभागाच्या उद्यान अधिकारी साक्षी लाड यांनी सांगितले की, चारही नारळाच्या झाडांभोवती मातीचे कुंपन केले जाईल. त्यात भरपूर पाणी ओतल्यावर झाडांमधील रासायनिक द्रव्य बाहेर येण्यास मदत होईल. यातून काही झाडे वाचतील. संबंधित प्रकरणातील अज्ञात व्यक्तींवर महापालिकेकडून त्वरित कारवाई केली जाईल. ग्रीन मुंबई मिशनचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, नारळाच्या झाडांवर विषप्रयोग होऊन बारा दिवस झाले, तसेच महापालिकेकडून झाडांना वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. बारा दिवसांनंतर महापालिकेने पोलीस प्रशासनाला पत्र पाठविले, परंतु पोलिसांचे काम गुन्हेगारी रोखण्याचे असून, झाडे वाचविणे हे त्यांचे काम नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्यामुळे, चार झाडांपैकी दोन झाडे पूर्णपणे सुकत आहेत. महापालिका प्रशासनाने निष्काळजीपणा दाखविल्यामुळे कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेविका शिल्पा चोगले यांनी आंदोलनादरम्यान केली.

माझ्या पतीने ४० वर्षांपूर्वी नारळाची झाडे लावली होती. त्यांना अगदी पोटच्या पोरासारखे वाढविले. मात्र, काही अज्ञात लोकांना येऊन झाडांचा बळी घेतला. त्यांचा शोध लवकरात लवकर लागून त्यांना शिक्षा व्हावी.
- मंदाकिनी कदम, स्थानिक रहिवासी.

Web Title: People's movement to save the trees in Borivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई