Join us  

मढवासियांचा 14 किलोमीटरचा फेरा वाचणार

By admin | Published: April 03, 2017 2:44 PM

वेसावे-मढ खाडीवर पूल मढवासियांचा 14 किलोमीटरचा फेरा वाचणार असून मासेमारीव्यवसायाला गती मिळणार असून इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर
मुंबई, दि. 3 -  गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वेसावे-मढ खाडीवर पूल उभारण्यासाठी वेसाव्याच्या शिवकर समाज आणि मढग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या खाडीवर पूल उभारल्यास मढवासियांचा 14 किलोमीटरचा फेरा वाचणार असून मासेमारीव्यवसायाला गती मिळणार असून इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच त्यांना शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा जवळ येणार आहे.
 
सध्या या मार्गावर वेसावा मच्छीमार सहकारी संस्थेची रोज सकाळी ५ ते मध्यरात्री १.३० पर्यंत फेरीबोट सेवा दर दहा मिनिटांनी असून रोज या मार्गावर सुमारे ५००० ते ६००० नागरिक प्रवास करतात. तर या मार्गावर मांडवी गल्ली जमातीची १४ सीटर अलिशान फेरी बोटसेवा देखील आहे.
 
मढ-वेसावे खाडीवर पूल नसल्यामुळे मढवासियांना मालाड(प)रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी १४ किमीचा लांबचा पल्ला पडतो. मढवासियांचा प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय असल्यामुळे मासेमारीसाठी लागणारा बर्फ, मासेमारी विक्री करण्यासाठी हा लांबचा पल्ला पार करावा लागत असल्यामुळे इंधनाबरोबर वेळेचा देखील अपव्यय होतो. मढवासियांना शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालय सर्वच लांब असल्यामुळे त्यांना १४ किमीपर्यंत शिक्षणासाठी आणि आरोग्यसेवेसाठी मालाडला जावे लागते.
 
त्यामुळे या मार्गावर पूल उभारणे गरजेचे असल्याचे माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. प्रभाग क्र.४९च्या शिवसेनेच्या निर्वाचित नगरसेविका संगीता सुतार,किरण कोळी,संजय सुतार,उपविभागप्रमुख अनिल भोपी,बाबू सुतार,कृष्णा कोळी,भास्कर निळा इत्यादी मढच्या कार्यकर्त्यासह मढ वेसावा खाडी पूलाला विरोध करणारे वेसावा येथील शिवगल्लीच्या शिवकर कोळी समाजाचे अध्यक्ष प्रवीण भानजी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
 
प्रवीण भानजी यांनी सर्वप्रथम नगरसेविका संगीता सुतार आणि किरण कोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमचा विकासाला विरोध नाही,परंतु शिवकर समाजाच्या मालकीच्या जागेतून हा पुलाचा(ब्रीज)रस्ता जात असून तसेच याठिकाणी समाजाची बोटी शाकारण्याची जागा आहे. त्यामुळे त्यास आमचा विरोध आहे. सदर रस्ता सरकारी जागेत हलवावा, अशी मागणी त्यांनी केली.       
 
गेल्या आठवड्यात पालिकेचे मुख्य अभियंता(ब्रीज) श्री.कोरी हे या पूलाच्या जागेबाबतीत पाहणी करण्यासाठी येथे आले होते. कोणाचे ही नुकसान न होता याठिकाणी ब्रीज उभारावा, अशी मागणी आपण केल्याची माहिती संजय सुतार यांनी दिली. तर या पूलाच्या उभारणीसाठी पालिका आणि मंत्रालय स्तरावर या पूलाची जागा बदलली असून परंतू सर्व्हे झाल्याशिवाय जागेत बदल झाला की नाही हे माहित होणार नाही अशी भूमिका अनिल भोपी यांनी मांडली.
 
किरण कोळी यांनी सांगितले की,शिवकर समाजाची जागा जाता कामा नये. तसेच बोटी शाकारण्याच्या जागेशी वेसावे खाडीच्या मुखाचा संबंध आहे. शिवकर समाजाच्या मासेमारी व्यवसायाला धोका होता कामा नये,पूलाची नियोजित जागा असो किंवा उत्तरेला जागा हलवल्यास सीआरझेडची परवानगी घ्यावी लागणार आहे. पूलाखालची जागा मत्स्यव्यवयासाठी शिवकर समाजाला मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे आम्ही  पाठपुरावा करु अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिवकर समाजाने सहकार्य करण्याची मागणी त्यांनी शेवटी केली.