मुंबई : गेल्या नऊ दिवसांपासून पाहुणचार घेणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लालबाग, परळ आणि काळाचौकीतील प्रसिद्ध बाप्पांच्या दर्शनासाठी दक्षिण मुंबईत शनिवारी भक्तांचा महापूर लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भक्तांचे नियोजन करण्यासाठी नामांकित मंडळांसह देखावे आणि चलचित्रांचे सादरीकरण करणाºया मंडळांतील कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा नारा देत, रात्र जागवावी लागणार आहे.लालबागचा राजाभोवती साकारलेल्या थ्रीडी सजावटीने भक्तांना मोहिनी घातली आहे, तर आगमनाला गर्दीचा उच्चांक गाठणाºया चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान झालेला तंजावरमधील बृहदेश्वर मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. याशिवाय गणेश गल्लीच्या राजाने साकारलेल्या मध्य प्रदेशातील सूर्य मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविक रांगा लावत आहेत. या रांगा वाढत जातील, असा अंदाज आहे.याशिवाय पर्यावरण वाचविण्याचा संदेश देणारे देखावे आणि चलचित्र साकारणाºया राणीबागचा विघ्नहर्ता आणि राणीबागचा चिंतामणी पाहण्यासाठी मंडळांबाहेरही भक्तांच्या रांगा लागत आहेत. ही गर्दी आता शेवटच्या दिवशी आणखी वाढेल, असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांना आहे. ग्रीन गणेशाचा संदेश देत, अंजीरवाडीतील गणेश मंडळाने शेकडो झाडे, वेली व रोपट्यांनी सजवलेला मंडप पाहण्यासाठी, तसेच खेतवाडीतील गल्ल्यांमधील उंचच-उंच गणेश मूर्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने ताडदेवपासून गिरगाव परिसरात फिरताना दिसेल, असा विश्वासही मंडळांनी व्यक्त केला आहे.>सकाळी १० वाजता नवसाची रांग बंदलालबागच्या राजाची चरणस्पर्श अर्थात, नवसाची रांग शनिवारी सकाळी १० वाजता बंद करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळा कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शनिवारी मध्यरात्री १२ वाजता मुख दर्शनाची रांग बंद करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या वेळेत जे भाविक रांगेत उभे असतील, त्या सर्वांना लालबागचा राजाचे दर्शन घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाप्पाच्या दर्शनासाठी आज लोटणार महासागर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:01 AM