Join us  

'लोकांची कामे होणं महत्त्वाचं', पुण्यातील रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या बैठकीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:40 PM

मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे

मुंबई - राज्यातील राजकारणात मोठा भूकंप रविवारी झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. आज शरद पवारआणिअजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. सत्तासंघर्षाच्या या लढाईत महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील ह्याही मुंबईत आल्या असून त्यांनी अजित पवारांच्या गटातील बैठकीला हजेरी लावली आहे. 

मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अजित पवारांनी ही बैठक बोलावली असून प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. या शक्तिप्रदर्शनात किती आमदार व्यासपीठावर उपस्थित राहतील. यावरून निश्चित होणार आहे की अजित पवार यांना किती आमदारांचे समर्थन आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी १ वाजता बोलावली आहे. यासंदर्भात व्हिपही बजावण्यात आला आहे. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली आहे. तसेच, शरद पवार हेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आम्ही आजही एकच आहोत, केवळ लोकहित आणि पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांची कामे व्हावीत, या उद्देशाने अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आम्ही अजित पवारांसोबत आहोत. शेवटी लोकांची कामे होणं महत्त्वाचं असल्याचं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं. तसेच, ५० खोके, एकदम ओके ह्या घोषणेशी आमचा संबंध नाही, ते शिवसेना आणि शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना विचारलं पाहिजे. कारण, शिंदेच्या पक्षातील आमदार मुंबईतून गुवाहटीवरुन मुंबईला परत आले होते. पण, अजित पवार हे थेट देवगिरी बंगल्यावरुन मंत्रीपदाची शपथ घ्यायला आले, त्यामुळे, ५० खोके, एकदम ओके आमच्यासाठी नसल्याचेही रुपाली ठोंबरे यांनी म्हटले. 

अजित पवारांसोबत ४० आमदार? 

शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत? याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. दरम्यान, अजित पवारांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार  असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे, असे अनिल पाटील म्हणाले. तसेच, सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही. त्यामुळे याठिकाणी आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील ९५ टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ, असेही अनिल पाटील यांनी सांगितले. याचबरोबर, ४० आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षराष्ट्रवादी काँग्रेसपुणेमुंबई