Join us  

वर्सोव्यात उभारली प्रति अयोध्या

By मनोहर कुंभेजकर | Published: January 21, 2024 6:52 PM

वर्सोवा येथे अयोध्या येथे होणारा प्रभू श्री राम जन्मभूमी येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवता येणार आहे. 

 मुंबई- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिराचा लोकार्पण सोहळा व प्रभू श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा उद्या दि, २२ जानेवारी  रोजी होत आहे. त्या निमित्ताने अयोध्या नगरी आणि संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. देशभरातून आणि जगभरातून हजारों भाविक प्रभू श्री रामांच्या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पण या सोहळ्याला प्रत्यक्षपणे उपस्थित न राहू शकणाऱ्या  वर्सोवाकरांना वर्सोवा येथे अयोध्या येथे होणारा प्रभू श्री राम जन्मभूमी येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवता येणार आहे. 

वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी उद्या सोमवार, २२ जानेवारी रोजी वर्सोवा, एस व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम येथील दिल्ली दरबार हॉटेल समोरील मैदानात प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन केले असून वर्सोव्यात प्रति आयोध्या उभारली आहे.

या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, ज्या राम भक्तांना हा सोहळा अनुभवायचा आहे,मात्र तिथपर्यंत पोहचता येणार नाही, अशा  वर्सोवाकरांसाठी आम्ही प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वर्सोव्यातूनच दाखवणार आहोत. त्यासाठी प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सुंदरकांड पाठ व रामनाम पठण, सत्यनारायण महापूजा व होम हवन, महाआरती, भजनसंध्या व महाभंडारा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. 

टॅग्स :राम मंदिर