लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार २२ सप्टेंबरला विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. आतापर्यंत तिसऱ्या फेऱ्यांमध्ये राज्यातील पाचही विभागांत मुंबई विभागात प्रवेशाची टक्केवारी सगळ्यात कमी झाली आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण तीन लाख २० हजार ५०० जागा आहेत. मात्र, ऑनलाईन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतरही मुंबई विभागात अद्याप एक लाख ८९ हजार ८४९ जागा रिक्त असून, आतापर्यंत एक लाख ३० हजार ६५१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागात रिक्त जागांची टक्केवारी सुमारे ६० टक्के आहे.
मुंबई विभागाचा यंदाचा दहावीचा निकाल ९६.७२ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या तीन लाख ३१ हजार १३६ विद्यार्थ्यांपैकी तीन लाख २० हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेल्या निकालामुळे अकरावी प्रवेशासाठीची स्पर्धा आणि विद्यार्थीही अधिक असतील अशी अपेक्षा होती. मात्र, निश्चित प्रवेशाच्या संख्येवरून विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाला थंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय, पॉलिटेक्निकडे कल असल्याने अकरावी प्रवेशांत घट झाली आहे.
अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून अर्ज केलेल्यांपैकी दोन लाख ४४ हजार २४६ विद्यार्थी पात्र आहेत. संकेतस्थळावरील अकरावी प्रवेशाच्या अहवालानुसार त्यातील ५३ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर अद्याप ४६ टक्के विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी तिन्ही फेऱ्यांमध्ये यादीत नाव येऊनही प्रवेशासाठी रिपोर्ट न केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशास अलॉट होऊनही प्रवेश न घेण्यामागे काय कारण आहे? विशेष फेरीत तरी ते प्रवेश घेणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
चौकट
नामांकित महाविद्यालयासाठी आग्रही
यंदा अनेक विद्यार्थ्यांना नव्वदीपार गुण आहेत. त्यामुळे पहिल्या तीन फेऱ्यांत नामांकित महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांचा कट ऑफ हा नव्वदीपारच राहिला आहे. मात्र, तरीही अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित व विशिष्ट महाविद्यालयासाठी आग्रही असल्याने अद्यापही प्रवेश घेतले नसल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी विशिष्ट महाविद्यालयाचा आग्रह न धरता या फेरीत मागील कट ऑफ पाहून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावेत आणि प्रवेश निश्चित करावेत असा सल्ला शिक्षण अधिकारी देत आहेत.
----------
यादी - अलॉट जागा - प्रवेशित विद्यार्थी
पहिली यादी - ११७८८३- ५८५०६
दुसरी यादी - ६००३७- २१११६
तिसरी यादी - ३९९६४- १३६९६
--------
कोटानिहाय रिक्त जागा
कोटा - प्रवेशित विद्यार्थी - प्रत्यार्पित जागा - रिक्त जागा
इनहाऊस - ७२१७- ४८९२- ८६३२
अल्पसंख्याक -२७२१५- ३६७०६- २४०२५
व्यवस्थापन - ३४६५- ६७४- ११७१९
---------
मुंबईत अकरावीचे प्रवेश कमी का?
- कोरोना काळात अनेक कुटुंबे मुंबईतून मूळ गावी स्थलांतरित झाली आहेत.
- अनेक विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाऐवजी तत्काळ अर्थार्जनासाठी उपयुक्त कौशल्य अभ्यासक्रमांची निवड करीत आहेत.
- अनेक विद्यार्थ्यांनी कोरोना काळात अभ्यासाऐवजी आर्थिक परिस्थितीमुळे नोकरीचा पर्याय निवडल्याची शक्यता
- पहिल्या फेरीत प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहिले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून पसंतीच्या महाविद्यालयासाठीचा आग्रही प्रवेश निश्चित न करण्यासाठी कारण ठरू शकतो.