Join us

ऑनलाइन वर्गात मुलांच्या "शिकण्याचा" टक्का घसरतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

सीमा महांगडेमुंबई : ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा टक्का घसरत आहे. त्यामुळे शिक्षणाचे अपरिमित नुकसान होत आहे. मात्र, त्यांच्या सामाजिक, ...

सीमा महांगडे

मुंबई : ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा टक्का घसरत आहे. त्यामुळे शिक्षणाचे अपरिमित नुकसान होत आहे. मात्र, त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे काळाची गरज होती. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात विद्यार्थी हित सामावलेले असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक व समुपदेशक व्यक्त करत आहेत.

कोरोना संकटामुळे विद्यार्थी शाळा, शालेय उपक्रम, सहशालेय उपक्रम, खेळांच्या सहभागापासून दूर आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आवश्यक आहे. शाळा बंद असल्याने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे बालविवाह, बालमजूर तसेच शाळाबाह्य विद्यार्थी होण्याची शक्यता वाढीस लागली होती. २०२०-२१ पेक्षा ह्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात रमलेले दिसले नाहीत.

विविध वर्गांत क्रिया, स्पर्धा आणि शाळेत दिला जाणारा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येण्यास नक्कीच साहाय्य करेल, असे मत निवृत्त प्राचार्य आणि समुपदेशक सुदाम कुंभार यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शाळाबाह्य होण्यापासून व बालमजुरीपासून रोखण्यासाठी आणि समाजाच्या सर्व स्तरांतील मुलांना शाळेच्या नियमित प्रवाहात आणण्यासाठी शाळा सुरू करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑनलाइनमध्ये अभ्यास होत नसल्याने ऑफलाइन खाजगी क्लासकडे बहुतांश मुले वळली आहेत. शाळा सुरू होण्याचे घेतलेले निर्णय अनेकदा फसवे ठरल्याने अखेरचा मार्ग म्हणून विद्यार्थी आणि पालकांना अशी जोखीम घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय कृतीत आणणे आवश्यक असल्याचे मत शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी मांडले.

पालकांनी शाळा सुरू झाल्यावर लगेचच मुलांच्या मागे अभ्यासाचा तगादा लावणे टाळून त्यांना पुन्हा ऑफलाइन शालेय वातावरणात काही दिवस रुळू द्यावे, असेही त्यांनी सांगितले. आता ऑनलाइन शिक्षणात आगंतुक बाह्य उपद्रवी घटनांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे भलत्याच गुन्हेगारी समस्यांनी शिक्षक आणि विद्यार्थीही धास्तावले आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे हे मुलांसाठी आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले.

स्क्रीन लर्निंगच्या सवयी हळूहळू बदलण्याची गरज

सुमारे वर्षभरापासून स्क्रीन लर्निंगच्या जडलेल्या आभासी सवयी बदलताना, पुन्हा सुरक्षित सामाजिकीकरणाची शारीरिक, मानसिक सांधेजुळणी होण्यासाठी शासनाने विचारपूर्वक घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना समजावून घ्याव्यात आणि आपापल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि शिक्षकांनाही सहकार्य करावे, असा सल्ला समुपदेशक देत आहेत.