मुंबई उपनगरात कोरोना लसीकरणाची टक्केवारी अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:47 AM2021-01-31T02:47:52+5:302021-01-31T02:48:24+5:30
corona vaccination update : मुंबईत लसीकरणाची प्रक्रिया हळूहळू वेग घेते आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत शहराच्या तुलनेत उपनगरात सर्वाधिक लसीकरण झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई - मुंबईत लसीकरणाची प्रक्रिया हळूहळू वेग घेते आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत शहराच्या तुलनेत उपनगरात सर्वाधिक लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या लसीकरणात उपनगरामध्ये ४ हजार ९०० चे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यात ३ हजार ८२८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे, तर शहरात ३ हजारचे लक्ष्य होते, त्यातीस १ हजार ६०९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा लाभ घेतला आहे.
राज्याच्या लसीकरणाचा आढावा घेतला असता, राज्यात शुक्रवारी पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यात पुण्याकरिता ४ हजार ६०० चे लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यातील ४ हजार ६८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर त्याखालोखाल ठाण्यात ४ हजार ६१० चे लक्ष्य होते. त्यातील २ हजार ८९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. साताऱ्यात १ हजार ६०० चे उद्दिष्ट्य होते. यावेळी लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १ हजार ७५९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी ८० टक्के लसीकरण करण्यात आले. त्यापूर्वी हे प्रमाण ७७ टक्के, २७ आणि २८ जानेवारी रोजी ६५ टक्के, २५ जानेवारी रोजी ६५ टक्के, २३ जानेवारीला ४५ टक्के, २२ जानेवारी रोजी ३९ टक्के, २० जानेवारी रोजी ३३ टक्के आणि २१ जानेवारी रोजी ३२ टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार
सध्या शहर उपनगरात १२ लसीकरण केंद्र आहेत. यापुढे लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण कऱण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. शहर उपनगरातील अन्य कोविड केंद्र, तसेच पालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार सुरू करण्यात येतील.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका