मुंबई : दहावीच्या निकालात मुंबई विभागानेही टक्केवारीत बाजी मारल्याने विद्यार्थ्यांना आता अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र ‘कट आॅफ लिस्ट’चा टक्काही वाढणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आता प्रवेशाची धाकधूक वाढली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विभागाच्या निकालाची टक्केवारी यावर्षी ४.०६ वाढली आहे. त्यातही ७५ टक्क्यांहून गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी ‘कट आॅफ लिस्ट’ही वाढणार असून, ती नव्वदीवर पोहचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसईच्या अंदाजे ४ हजार विद्यार्थ्यांची यात भर पडली आहे. त्यामुळे आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. दहावीच्या निकालात मुंबई विभागातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार १०० एवढी असून, गतवर्षी ती ९ हजार ११ एवढी होती. तर ८५ ते ९० टक्के मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ४८१ एवढी आहे. ६० ते ८० टक्के मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७० हजार एवढी आहे. महत्त्वाचे म्हणजे सीबीएसई आणि आयसीएसईच्या ५ हजार विद्यार्थ्यांनी ९० हून अधिक टक्के मिळविले आहेत. परिणामी रुईया, रुपारेल आणि पोद्दारसह नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकआॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे : ८ जून ते १५ जूनत्रुटी दुरुस्त करून अद्ययावत करणे : १६ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)सर्वसाधारण गुणवत्ता यादी : २० जून सायंकाळी ५ वाजताप्रथम गुणवत्ता यादी : २२ जून सायंकाळी ५ वाजताद्वितीय गुणवत्ता यादी : ३० जून सायंकाळी ५ वाजतातृतीय व अंतिम गुणवत्ता यादी :६ जुलै सायंकाळी ५ वाजताआॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची उद्दिष्ट्ये : अर्जदाराला फार प्रवास न करता ही प्रक्रिया पार पाडता यावी. अर्जदाराला एकाच अर्जामधून अनेक महाविद्यालयांना अर्ज करता यावा. प्रवेश करताना सरकारी नियमांचा योग्य तो सारखाच अर्थ काढून त्याचे पालन व्हावे आणि सर्व अर्जदारांना योग्य आणि सारखा न्याय मिळावा. सर्व प्रक्रियेची एकत्रित आणि अद्ययावत माहिती संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्याही वेळेला उपलब्ध व्हावी.
‘कट आॅफ’चा टक्का वाढणार
By admin | Published: June 10, 2015 3:11 AM