मुंबई : दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांचा त्रास पाळीव प्राणी आणि इतर पशुपक्ष्यांना होत असतो. प्राण्यांना आवाजाचा आणि धुरांचा त्रास प्रचंड होतो. फोडलेल्या फटाक्यांच्या त्रासामुळे परळ येथील बैल घोडा रुग्णालयात श्वान, मांजर, पक्षी इत्यादी प्राणी उपचारासाठी दाखल झाले आहेत. नागरिकांमध्ये प्राण्यांप्रति जनजागृती मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे या वर्षी कमी प्रमाणात प्राणी रुग्णालयात दाखल झाल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले.
परळ येथील बैल घोडा पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव जे. सी. खन्ना म्हणाले, आतापर्यंत ११ श्वान उपचारासाठी दाखल झाले आहेत. फटाक्यांच्या धुरामुळे त्यांना डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. श्वानांच्या डोळ्यांत जळजळ होत आहे. सात मांजरे उपचारासाठी दाखल झाली असून ती बिथरलेल्या स्थितीमध्ये आहेत.
पक्ष्यांमध्ये १० ते १२ कबुतरे उपचारासाठी आली असून त्यातील ४ कबुतरे जखमी अवस्थेत आहेत. तसेच ४ ते ५ घारी जखमी झाल्या असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. यंदा प्राणिप्रेमी मित्र, संस्था व संघटनांच्या वतीने केलेल्या जनजागृतीमुळे जखमी पशू-पक्ष्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाले आहे.