- संतोष आंधळेमुंबई : विविध अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची ‘अवयवांसाठी रोजचा संघर्ष’ या मालिकेद्वारे संघर्षगाथा ‘लोकमत’ने मांडली. अवयवांची मागणी असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आणि प्रत्यक्षात अवयव मिळण्याची संख्या कमी, असे व्यस्त प्रमाण असल्यामुळे अनेक रुग्ण हे औषधोपचावरावर खितपत जगत आहेत. येत्या काळात आरोग्य विभाग अवयवदानाच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविणार असून लोकसहभाग वाढविणार आहे.
अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. आजही राज्यात अवयवदानाबाबत रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये मोठे गैरसमज आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता या दोन मुख्य कारणांमुळे अवयवदानाचा टक्का कमी असल्याचे सांगितले जाते. मुंबई आणि पुणे या दोन शहरांत अवयवदान मोठ्या प्रमाणावर होते. मात्र राज्याच्या इतर शहरांत अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. प्रत्येक राज्यात अवयवदान नियमनाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्थेची स्थापना केलेली आहे. संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, परदेशातील रुग्णालयात मेंदूमृत दाता शोध विभाग (डोनर डिटेक्शन युनिट) असतो. त्या विभागातील डॉक्टरांचे केवळ रुग्णालयातील मेंदूमृत दाता शोधून त्याला मेंदूमृत प्रमाणित करण्यापासून ते नातेवाइकांच्या समुपदेशनाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळे परदेशात अवयवदानाचे प्रमाण अधिक आहे.
अवयवदानाचा टक्का वाढवायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, येत्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागात जनजगृती करणार आहोत. तसेच काही दिवसांपूर्वी जेव्हा विशेष कृती दलाची बैठक झाली, त्यामध्ये ज्या रुग्णालयांना प्रत्यारोपणाची परवानगी देण्यात आली आहे त्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.