एसटी कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:54 PM2020-04-09T12:54:55+5:302020-04-09T12:55:34+5:30
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून बस सेवा सुरू आहेत. या सेवा बजाविणाऱ्या एसटी कामगारांची दररोज थर्मल स्क्रिनिंग आणि आरोग्य तापसणीसाठी तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
मुंबई : अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळाच्या बस सेवा सुरू आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून बस सेवा सुरू आहेत. या सेवा बजाविणाऱ्या एसटी कामगारांची दररोज थर्मल स्क्रिनिंग आणि आरोग्य तापसणीसाठी तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.
मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालय आहे. तर, परळ येथे महत्त्वाचे डेपो आहे. या एसटीच्या दोन्ही डेपोवर कोरोनाच्या अनुशंगाने दक्षता घेणे गरजेचे आहे. कारण हे दोन्ही परिसर कोरोना हॉटस्पॉटमध्ये आलेले आहे. या दोन्ही डेपोतून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या बस गाड्या धावत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षेची गरज आहे. एसटी महामंडळाने चालक, वाहक, वाहतूक नियंत्रण, यांत्रिकी कर्मचारी यांची थर्मल स्क्रिनिंग आणि आरोग्य तापसणीसाठी करणे गरजेचे झाले आहे.
मुंबईत सध्या 857 च्यावर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. तो परिसर खबरदारी म्हणून प्रशासनाने सील करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल डेपो जवळील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. परळ आणि मुंबई सेंट्रल डेपो बाजूला कोरोना हॉटस्पॉट परिसर असल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आता आवश्यक वाटत आहे, असे जगताप यांनी सांगितले.
एसटी महामंडळाकडून एसटीच्या चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॅन्ड ग्लोज, मास्क, सॅनिटाझर तसेच जेवणाची सुद्धा व्यव्यस्था केली आहे. तरीही खबरदारी म्हणून एसटी डेपोत आरोग्य तपासणीची स्वतंत्र सुविधा देण्यात यावी. कर्मचाऱ्यांची आरोग्याविषयी काळजी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहेत.