आरोग्य विभागाची कामगिरी, सगळी पदे रिकामी; पद अपग्रेड करून स्वतःचा नंबर लावण्यातच अधिकारी मश्गूल

By संतोष आंधळे | Published: August 17, 2023 08:24 AM2023-08-17T08:24:34+5:302023-08-17T08:25:16+5:30

दोन संचालक, चार अतिरिक्त संचालक, पाच सहसंचालक, २३ उपसंचालक 

performance of health department all posts vacant officers are busy in upgrading the post and putting their own number | आरोग्य विभागाची कामगिरी, सगळी पदे रिकामी; पद अपग्रेड करून स्वतःचा नंबर लावण्यातच अधिकारी मश्गूल

आरोग्य विभागाची कामगिरी, सगळी पदे रिकामी; पद अपग्रेड करून स्वतःचा नंबर लावण्यातच अधिकारी मश्गूल

googlenewsNext

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात २ संचालक, ४ अतिरिक्त संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही सगळी प्रमुख पदे रिकामी आहेत. पदे भरण्यासाठी एमपीएससीमार्फत प्रक्रिया राबवावी असे अधिकाऱ्यांना वाटत नाही. कारण खालच्या पदावरच्या अधिकाऱ्यांना आपले पद ‘अपग्रेड’ करून महत्त्वाच्या पदांवर बसून राहायचे आहे. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील २३८ पदेही रिकामी आहेत. 

कळवासारखी दुर्घटना घडली की सार्वजनिक आरोग्य विभाग जागा होतो. तेवढ्यापुरते काम केल्यासारखे दाखवतो. आपल्या विभागात काय अनागोंदी चालू आहे याची चौकशी न करता, ज्याचा आपला काहीही संबंध नाही, त्या ठाण्यातील कळवा हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढले आहेत. ठाण्याचे हॉस्पिटल नगर विकास विभागाच्या अंतर्गत येते. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचाराची चौकशी सार्वजनिक आरोग्य विभाग करू शकेल. मात्र ठाण्यात डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यातून मृत्यू वाढत आहेत. याची चौकशी सार्वजनिक आरोग्य विभाग कसा करू शकेल? असा प्रश्न काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

आरोग्य विभागातील ‘विभागीय पदोन्नती समिती’च सध्या कोमात आहे. अनेक वर्ष अधिकाऱ्याची पदोन्नती केली नाही. खालच्या पदावरचा अधिकारी वरिष्ठ पदावर बसवून दिवस साजरे केले जात आहेत. गेली अनेक वर्ष विभागात संचालक पदावर कायम खालच्या पदावरील व्यक्तीला पदभार दिला गेला आहे. ॲडिशनल चार्ज म्हणून ज्या दोघांना संचालक पदाचा पदभार दिला होता, त्या दोघांनाही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मूळ पदावर पाठवून दिले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाला एकही संचालक उपलब्ध नाही. कोरोना काळात शहर संचालक नावाचे पद निर्माण करण्यात आले होते. त्यांनी महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय ठेवणे अपेक्षित होते. ते पद रिकामेच आहे. नागपूर येथे सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे संचालक पद रिकामे आहे. ते अतिरिक्त कार्यभारावर चालू आहे. ६५,७९१ मंजूर पदे, ४८,६८६ भरलेली पदे, १७,१०५ रिक्त पदे.

८ अधिकाऱ्यांची केली नियुक्ती 

सार्वजनिक आरोग्य विभागाने कनिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या ८ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावरचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश काढले आहेत.

तडकाफडकी बदली कशासाठी?

पुणे, मुंबई येथे संचालक पदावर अतिरिक्त कार्यभार म्हणून कार्यरत असणारे डॉ. नितीन अंबाडेकर आणि डॉ. स्वप्निल लाळे या अधिकाऱ्याचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे.

संचालक पद अनेक वर्षे रिक्त असले तरी ते मिळावे म्हणून स्पर्धा तर सोडाच, पण कनिष्ठ अधिकाऱ्यांची  इच्छाही नाही. नियमानुसार त्यांची पात्रता नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सल्लामसलत करून दोन्ही अधिकाऱ्यांकडील संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याचा विचारपूर्वक घेतलेला धाडसी निर्णय आहे. दुसरी, तिसरी, चौथी फळी सक्षम आणि प्रोत्साहित करून या परिस्थिती वर लवकरच तोडगा काढू. संपूर्ण मोफत उपचार, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे व्यापक स्वरूप, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची मोठी संख्या ही उदाहरणे पाहता आरोग्य विभागाविषयी शासन कटिबद्ध आहे. - मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य विभाग.


 

Web Title: performance of health department all posts vacant officers are busy in upgrading the post and putting their own number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.