- चेतन ननावरे, मुंबई
वरळीतील कस्तुरबा गांधीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गतवर्षी पंढरपूरची प्रतिकृती साकारली होती. यंदाही सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी मंडळाने प्रति शिर्डी उभारण्याचा निश्चय केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सामाजिक संदेश देताना परंपरा जपण्यासाठी मंडळाने गेल्या दोन वर्षांपासून डीजेला बगल दिली आहे.लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वारसा पुढे नेण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे, असे मंडळाचे कार्याध्यक्ष रूपेश महाडिक यांनी सांगितले. महाडिक म्हणाले की, या वर्षी मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष असून गणेशभक्तांसाठी मंडळाने विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंडळाने आगमन सोहळ्यात डीजेचा वापर बंद केला आहे. निमंत्रणाची परंपरा! : मराठेशाहीमध्ये जसे हाती मशाल घेऊन मावळे निमंत्रण द्यायला जायचे, तीच परंपरा मंडळाने जपली आहे. आजही आगमन सोहळ्याच्या आदल्या सायंकाळी मंडळाचा कार्यकर्ता हाती मशाल घेऊन निमंत्रण देण्यासाठी जातो. यंदाही २८ आॅगस्टला आगमन सोहळा असून २७ आॅगस्टला सायंकाळी मंडळाचा कार्यकर्ता हाती मशाल घेऊन वरळी, लोअर परळ, लालबाग आणि नजीकच्या परिसरातील मंडळांना गणेशोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी जाईल. या वेळी प्रत्येक मंडळाला वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी एक रोपटे भेट म्हणून देणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.एक नगर एक गणपती : कस्तुरबा गांधीनगरमध्ये एकूण ६ सोसायट्या असून त्यांच्या १२ इमारती आहेत. यामध्ये परेल-शिवनेरी, परेल-सह्याद्री आणि परेल-शिवसंदेश या तीन सोसायट्यांच्या प्रत्येकी तीननुसार एकूण ९ इमारतींचा समावेश आहे. याशिवाय महावीर, आकांक्षा आणि अवंतिका या तीन सोसायट्यांच्या एकूण तीन इमारती आहेत. मात्र या सर्व सोसायट्या आणि इमारतींनी मिळून विभागात केवळ एकच गणेशोत्सव मंडळ सुरू ठेवले आहे. त्यामुळे ‘एक नगर एक गणेशोत्सव’द्वारे मंडळाने एकतेचा संदेश दिला आहे.सामाजिक कार्यांची जाणगेल्या वर्षभरात मंडळाने रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम आणि बच्चेकंपनीसाठी विविध शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यंदाही मंडळाने गणेशोत्सवाच्या १० दिवसांत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी दानपेटीत जमा झालेली सर्व रक्कम मंडळाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दान केली.शिस्तप्रिय मंडळविभागात उत्सव साजरा करताना शांतता आणि शिस्तप्रियतेसाठीही मंडळाची ओळख आहे. गतवर्षी गणेशोत्सव काळात मंडळाने शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी शिस्तबद्धपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमांची दखल खुद्द मुंबई पोलिसांनीही घेतली. शिवाय मुंबई पोलीस आयुक्तालयाने मंडळाला तसे प्रमाणपत्र दिले आहे.