मेट्रोसाठीचा कालावधी येणार आणखी जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:22+5:302021-07-25T04:06:22+5:30
मुंबई : पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. कारण ...
मुंबई : पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. कारण या दोन्ही मेट्रो मार्गांवर चाचणीसाठीचा रेलिंग स्टॉक्सचा एक नवा रेक चारकोपच्या मेट्रो डेपोमध्ये दाखल झाला आहे. मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी तपासणी केली जाणार असून, या चाचणीमुळे पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रोसाठीचा कालावधी आणखी जवळ येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप डेपोमध्ये भारतीय बनावटीचे एकूण सहा मेट्रो कोच दाखल झाले आहेत. सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यावर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ वर सुरू असलेल्या चाचणी धावण्यांमध्ये नुकतेच दाखल झालेल्या मेट्रो रेकचा समावेश केला जाईल. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ येत्या काही दिवसांत प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रो रेल्वेचे तिकीट सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असेल; असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करत हे भाडे कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्त ८० रुपये असणार आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यांत सुरू होतील. डहाणूकरवाडी ते आरे हा सुमारे २० किमी लांबीचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ मध्ये तर उर्वरित संपूर्ण मार्ग जानेवारी २०२२ मध्ये प्रवाशांकरिता सुरू होईल. मुंबईत सप्टेंबर २०२१ पर्यंत १० मेट्रो ट्रेन दाखल होतील. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पांतून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक डब्यात चार जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
मेट्रो २ अ
कॉरिडोर - दहिसर पूर्व ते डीएन नगर
लांबी - १८.६ कि.मी
आगार - चारकोप
एकूण स्थानके - अंधेरी (पश्चिम), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), वळनाई, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरीवली (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कंदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व)
मेट्रो ७
कॉरिडोर - अंधेरी ते दहिसर
लांबी - १५.५ कि.मी
आगार - चारकोप
एकूण स्थानके - गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्योग आणि ओवरीपाडा
-----------------
अशी आहे मेट्रो
प्रत्येक ट्रेन ६ कोचची
प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांना बसण्याची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था
एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य
एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८०
अशी जोडणार मुंबई
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते डी.एन. नगर असा आहे. दहिसर येथे मार्ग ७, शास्त्रीनगर येथे ६, डी.एन. नगर येथे मार्ग ७ सोबत जोडला जाईल. मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूने जाईल. हा मार्ग अंधेरी येथे मार्ग १, जोगेश्वरी जेव्हीएलआर येथे मार्ग ६ आणि दहिसर येथे मार्ग २ अ सोबत जोडला जाईल.
अंतर (किमी) : भाडे (रुपयांत)
०-३ : १०
३-१२ : २०
१२-१८ : ३०
१८-२४ : ४०
२४-३० : ५०
३०-३६ : ६०
३६-४२ : ७०
४२ : ८०