‘जिल्हा ठाणे’ या शब्दाला पूर्णविराम
By admin | Published: August 2, 2014 01:24 AM2014-08-02T01:24:50+5:302014-08-02T01:24:50+5:30
प्रत्येक आई तिची मुले थोडी मोठी झाली, ती बोलायला लागली की आई म्हण, बाबा म्हण असे पुन्हा पुन्हा शिकवित असते.
पंकज राऊत, बोईसर
प्रत्येक आई तिची मुले थोडी मोठी झाली, ती बोलायला लागली की आई म्हण, बाबा म्हण असे पुन्हा पुन्हा शिकवित असते. त्या बरोबरच ती त्या मुलाला किंवा मुलीला नाव पत्ताही बोलायला शिकवते. त्यामध्ये नावाबरोबर गाव, तालुका व जिल्ह्याचे नावही असते. आपण जिल्हा ठाण्यातील असाच शब्द येथील जनतेला अंगवळणी पडला होता, आता जिल्हा पालघर झाला नि नव्या जिल्ह्याची घोकंपट्टी सुरू झाली.
आज ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण झाल्याने जिल्हा ठाणे या अंगवळणी किंवा लहानपणापासून मुखात बसलेल्या शब्दाला पूर्णविराम द्यावा लागणार आहे. दोन दिवसापासून व्हॉट्सअॅपवरही हाच विषय चर्चिला जात होता. एवढेच नाही तर ३१ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत आपण ठाणे जिल्ह्यात असू तर रात्री १२ नंतर आपण पालघर जिल्ह्यात येऊ असेही पोस्टींग व्हॉटस्अॅपवरून होत होते.
माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी त्याची वेगवेगळ्या ठिकाणी ओळख किंवा कुठला रहिवासी आहे, हे सांगताना प्रथम देश, राज्य, जिल्हा, तालुका गाव व त्यानंतर आळी किंवा वाडी हे सांगितले जाते. आता पालघर जिल्हावासी आम्ही पालघर जिल्ह्याचे आहोत, असे अभिमानाने सांगतील, तर विशेष बाब म्हणजे आज पालघर जिल्हाक्षेत्रात ज्या मुला-मुलींचा जन्म झाला, त्यांच्या आईला त्यांच्या मुलांना पत्ता व जिल्ह्याचे ठिकाण शिकविताना पालघर जिल्हा असे शिकवावे लागणार नाही. (वार्ताहर)