विकासकामांच्या ७०० कोटींच्या प्रस्तावांना स्थायीची झटपट मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:15 AM2019-03-01T05:15:40+5:302019-03-01T05:15:42+5:30
आचारसंहितेमुळे नगरसेवकांची धावपळ : प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने कामाचे कार्यादेश काढणे होणार शक्य
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच मुंबई महापालिकेत लगीनघाई सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील विकासकामे लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. त्यातच सन २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम एक महिना उरला असल्याने निधी वाया जाणार आहे. तत्पूर्वी विकासकाम मंजूर करून घेण्यासाठी तब्बल ७०० कोटींचे ८० प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर गुरुवारी मंजुरीसाठी मांडले. अवघ्या तासाभरात ९० टक्के प्रस्तावांना झटपट मंजुरी देण्यात आली.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात आवश्यक त्या कामांसाठी तरतूद करण्यास पालिका आयुक्त अजय मेहता यांनी प्राधान्य दिले. दरवर्षी जेमतेम ३० टक्के निधी विकासकामांवर खर्च होत असतो. आर्थिक तरतूद वाया जाऊ नये, यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त निधी विकासकामांवर खर्च करण्याचे लक्ष्य दिले. त्यामुळे डिसेंबर अखेरीस ३७ टक्के निधी विकासकामांवर खर्च झाला होता. उर्वरित तीन महिन्यांमध्ये हा आकडा वाढेल, असा प्रशासनाचा दावा होता. मात्र या वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वी मंजूर झालेल्या प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश निघू शकणार आहेत.
निवडणुकीच्या काळात आपल्या प्रभागातील विकासकामे ठप्प होऊ नयेत, यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. मुंबई महापालिकेने हाती घेतलेलीही अनेक विकासकामे स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे स्थायीच्या बैठकीत पालिका प्रशासनाने गुरुवारी तब्बल सातशे कोटी रुपयांचे ८० प्रस्ताव मांडले. या प्रस्तावांमध्ये अनेक महत्त्वाचे व जनतेच्या हिताचे प्रस्ताव आहेत.
काही महत्त्वाचे प्रस्ताव व त्यासाठीचा निधी
च्पश्चिम उपनगरातील के पश्चिम विभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण - २३ कोटी ५५ लाख.
च्विलेपार्ले पूर्व येथील शास्त्रीनगर नाला व श्रद्धानंद नाल्याचे बांधकाम करणे - २४ कोटी ९९ लाख.
च्दादर पश्चिम येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण - चार कोटी ५९ लाख.
च्पाण्याची गळती रोखणे - १७ कोटी.
च्भायखळा येथील पालिका शाळेची दुरुस्ती - आठ कोटी ४० लाख.
च्सायन पूर्व येथील शाळेची दुरुस्ती - चार कोटी ५७ लाख.
च्प्रभादेवी पालिका शाळेची दुरुस्ती - पाच कोटी ८२ लाख.
च्आठ पुलांची दुरुस्ती - १७ कोटी.
च्मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था - सात कोटी.
च्कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान - ३१ कोटी.
च्शहरात जलवाहिन्या बदलणे, टाकणे - सात कोटी ७६ लाख.
च्विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम - सध्या पाच कोटींची तरतूद.
च्शाळांच्या सुरक्षा, स्वच्छता, देखभालीसाठी - २३२ कोटी.