टेंबा रुग्णालयातील यंत्रखरेदीला स्थायीची नकारघंटा
By admin | Published: April 21, 2015 10:47 PM2015-04-21T22:47:25+5:302015-04-21T22:47:25+5:30
सुमारे २०० खाटांच्या क्षमतेच्या टेंबा या सर्वसाधारण रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेल्या ३८ लाखांच्या खरेदी प्रस्तावाला आज झालेल्या बैठकीत स्थायीने
भार्इंदर : सुमारे २०० खाटांच्या क्षमतेच्या टेंबा या सर्वसाधारण रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेल्या ३८ लाखांच्या खरेदी प्रस्तावाला आज झालेल्या बैठकीत स्थायीने फेटाळल्याने रुग्णालय सुरू होण्यात अडचण निर्माण झाली आहे. या प्रस्तावात रुग्णालयात लागणाऱ्या क्ष-किरण व त्याच्यासाठी लागणाऱ्या सीआर (कॉम्प्युटेड रेडिओग्राफी) सिस्टीम व डायलिसिस आरओ (रिव्हर्स आॅसमोसिस) प्लँट या यंत्राचा समावेश आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे शहरात एकही सर्वसाधारण रुग्णालय नाही. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या टेंबा रुग्णालयातही अनेक अडथळे निर्माण होत आहेत. न्यायालयाने २००६ मध्ये दाखल झालेल्या याचिकेनुसार पालिकेला २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पालिकेने २००९ मध्ये मे. किंजल कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकामाचा ठेका दिला. रुग्णालयाची इमारत तांत्रिक व आर्थिक अडचणींचा सामना करत २०१३ मध्ये पूर्ण झाली.
तत्पूर्वी २०१२ मधील महासभेत हे रुग्णालय राज्य शासन अथवा धर्मादाय वा सामाजिक संस्थेद्वारे चालविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावर, माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी हे रुग्णालय पालिकेनेच चालविण्यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
त्यावर, २८ मार्च २०१४ रोजी न्यायालयाने टेंबा रुग्णालय पालिकेनेच चालविण्याचा निर्वाळा देऊन ते सुरू करण्यासाठी योजण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. रुग्णालय सुरु होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आता धूसर झाली आहे. (प्रतिनिधी)