दादर, शिवाजी पार्कवर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:16 PM2021-10-14T21:16:09+5:302021-10-14T21:16:37+5:30
प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले.
मुंबई - दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या कार्यक्रमप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहूल शेवाळे, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मैदान परिसरातील सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून कायमस्वरुपी विद्युत रोषणाई व परिसर सुशोभीकरण, नागरिकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. pic.twitter.com/fP4mTEWWHu
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 14, 2021
असा साकारला प्रकल्प-
- शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन १९६६ मध्ये उभारण्यात आला. या पुतळ्यावर आजपर्यंत कोणतीही विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून सुमारे सव्वा कोटी लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये पाच वर्षांचा देखभाल खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व रंग बदलत्या स्वरुपाची आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा यासाठी रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.
- पुतळ्याच्या पदपीठावर विविध रंग बदलणारे एलईडी वॉल वॉशर दिवे लावले आहेत. तसेच पुतळ्याच्या पदपीठावरील खोबणीत एलईडी स्ट्रीप लावली आहे.
- पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
- पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत.
- बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत.
- मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ छोटेखानी खांब लावले आहेत.
- मैदान परिसरातील सात प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
- ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.