मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणात बाधीत होणा-या झोपडपट्टीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज लोकसभेत केली.आज संसदेत शुन्य प्रहरात शिवसेना खासदार कीर्तिकर यांनी ही मागणी केली.
विमानतळ प्राधिकरणाच्या एकूण भुखंडापैकी ४० टक्के भुखंडावर पात्र झोपड्या वसलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होऊ शकते. त्याकरिता केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. त्याच धर्तीवर जुहू विमानतळ नजीकच्या पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून जुहू विमानतळाचे देखील विस्तारीकरण करावे. ज्यामुळे जुहू विमानतळावरून लहान विमाने उड्डान करू शकतील. ज्याचा लाभ नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, सातारा येथील प्रवाश्यांना व भाविकांना घेता येईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.