लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उत्तर मुंबईतील वाहतूककोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून येथील नागरिकांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले. दहीसर विधानसभा मतदारसंघात दौलतनगर येथून बुधवारी सकाळी गोयल यांच्या प्रचारार्थ नमो यात्रेला सुरुवात झाली.
यावेळी येथील नागरिकांशी संवाद साधताना गोयल म्हणाले की, संपूर्ण मुंबईला वाहतूककोंडीची समस्या भेडसावत असल्याची जाणीव आहे. उत्तर मुंबई हे शहराचे शेवटचे एक टोक आहे. येथील वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत एसी लोकलसह अनेक सुविधा निर्माण केल्या. मेट्रो सेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना त्याचा लाभ मिळत आहे. मात्र, वाहतूककोंडीची समस्या कायमस्वरुपी मोडीत काढायची आहे. त्यासाठी वाहतूकतज्ज्ञांची मदत घेऊन कोणकोणत्या प्रकारे मार्ग काढण्यात येऊ शकतील, याचा आढावा घेत कमीत कमी वेळेत प्रवास कसा करता येईल, याबाबत सर्वतोपरी उपाययोजना केली जाईल.
या भागातील प्रत्येक सोसायटीत हा रथ पोहचला तेव्हा नागरिकांनी पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करीत पीयूष गोयल यांचे स्वागत केले. या फेरीत भाजपासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी उपस्थित होत्या.