परळ टर्मिनस मार्च २०१९ पर्यंत सेवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:46 AM2018-02-08T05:46:16+5:302018-02-08T05:46:27+5:30
मुंबई : अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाजवळ कोचिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी विशेष मंजुरी मिळालेली आहे. परळ कोचिंग कॉम्प्लेक्ससाठी १९३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, परळ कोचिंग कॉम्प्लेक्स उभे राहण्याआधी परळ टर्मिनस मार्च २०१९ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
सीएसएमटी येथील लांब पल्ल्यांची मर्यादा संपुष्टात आली असून, याला पर्याय म्हणून परळ कोचिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या निर्णयाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी केवळ मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस धावतात. परळ टर्मिनस आणि परळ कोचिंग कॉम्पलेक्स या दोन स्वतंत्र बाबी आहेत. परळ स्थानकात सध्या जे काम सुरू आहे ते परळ टर्मिनसचे आहे. मार्च २०१९ पर्यंत परळ टर्मिनसचे काम पूर्ण होईल.
परळ कोचिंग कॉम्प्लेक्सचा फायदा मध्य, पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसला होईल. येथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची साफसफाई होईल. मेल-एक्स्प्रेसही येथून सुटतील, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले.
>अर्थसंकल्पीय तरतूद
मध्य रेल्वे - यंदा ४,६१९ कोटी (२०१८-१९) , गतवर्षी अर्थसंकल्पात ४,४१९ कोटी (२०१७-१८)
पश्चिम रेल्वे - यंदा ५,८०२ कोटी (२०१८-१९), गतवर्षी अर्थसंकल्पात ४,४१८ कोटी (२०१७-१८)
>सरकते जिने -
३०० कोटींची तरतूद
मध्य रेल्वे - २१४ जिने
पश्चिम रेल्वे - १०० जिने
>सीएसएमटी रेल्वे संग्रहालयासाठी - ३ लाख
वांद्रे टर्मिनस विकासासाठी- ३४ कोटी
पश्चिम रेल्वेतील स्थानकांमध्ये मोफत वाय-फाय - ११५ कोटी
मध्य रेल्वे स्थानकांतील फलाट विस्तारिकरणासाठी - ८२ कोटी
>बुलेट ट्रेनसाठी
७ हजार कोटी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ७ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पाबाहेरील तरतुदीअंतर्गत हा निधी उभारण्यात येईल. यासाठी जागतिक बँक, पीपीपी असे पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे तो नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयासह अन्य मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.