मुंबई : राज्यातील रक्ताच्या साठ्याचे प्रमाण कळावे, रक्तघटकांचा वापर लक्षात यावा आणि परराज्यात जाणारे रक्त, रक्तघटक यांचा तपशील समजावा म्हणून राज्यात यापुढे कुठेही रक्तदान शिबिर भरवताना राज्य रक्त संक्रमण परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.अशा शिबिरांविषयी, तेथे गोळा झालेल्या रक्ताच्या साठ्याविषयी आणि त्या रक्ताचा वापर कसा होतो याबबात आयोजक कोणतीही माहिती देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात कुठेही रक्तदान शिबिर घेण्यापूर्वी त्याची माहिती देणे बंधनकारक केल्याचा निर्णय राज्य रक्त संक्रमण शिबिराने घेतला आहे.शिवाय शिबिरातील अपेक्षित रक्तसाठा, जागा आणि आयोजकांची माहितीही यापुढे द्यावी लागेल. शिबिर झाल्यावर किती युनिट रक्त जमा झाले त्याची माहिती, कोणत्याही व्यक्तीस त्रास झाल्याची नोंद पाठविणे सक्तीचे करण्यात आले आहे.राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले, राज्यात ३३३ रक्तपेढ्या असून यात ७५ शासकीय, १२ रेडक्रॉस, २२९ धर्मादाय संस्थांच्या, तर १६ खासगी पेढ्या आहेत. १२१ विभागीय रक्तसंक्रमण केंद्रे असून १६१ रक्त साठवणूक केंद्रे कार्यान्वित आहेत. शिबिरांचा सर्व तपशील नियमितपणे गोळा झाल्यास रक्तपुरवठ्याचा समन्वय साधता येईल.बऱ्याचदा गावांत किंवा शहरातही रक्तदान शिबिरे होतात. पण त्याची कोणतीच माहिती दिली जात नाही. या शिबिरातील रक्तसाठा कोणत्या पेढीला देण्यात येतो, तेही समजत नव्हते. अन्य राज्यांना रक्त व रक्तघटकांचेही वितरण करण्यात येते. त्यासाठी ही माहिती अद्ययावत असणे अत्यावश्यक होते. त्यामुळेच रक्तदान शिबिरे घेण्यापूर्वी माहिती देणे परिषदेने बंधनकारक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:48 AM