Join us

सचिन वाझेची चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:06 AM

एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची ...

एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी करण्याकरिता त्याचा ताबा मिळावा, यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे. बुधवारी विशेष न्यायालयाने सीबीआयला वाझेची चौकशी करण्याची परवानगी दिली. तसेच न्यायालयाने वाझेच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ केली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकाने भरलेली कार ठेवल्याप्रकरणी एनआयएने वाझेला १३ मार्च रोजी अटक केली आहे. त्यामुळे सध्या ताे एनआयएच्या ताब्यात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयला वाझेला काही प्रश्न करायचे आहेत. त्यासाठी त्याचा ताबा हवा असल्याने त्यांनी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला. वाझेला न्यायालयात हजर केल्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. न्या. प्रशांत सिंत्रे यांनी सीबीआयला वाझेची चौकशी करण्याची परवानगी दिली. तसेच ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीही सुनावली. तर अन्य दोन आरोपी असलेले निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

...........................