लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात ड्रोन संचलनाला चालना देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एनपीएनटी (नो परमिशन नो टेक ऑफ) अंतर्गत १६६ हरित क्षेत्रांत उड्डाणाची परवानगी दिली आहे. त्यात राज्यातील २२ ठिकाणांचा समावेश आहे.
या क्षेत्रांत जमिनीपासून ४०० फुटांपर्यंत ड्रोन वापरता येतील. याआधी देशभरात ६६ हरित स्थळांवर ड्रोन संचलनासाठी परवानगी देण्यात आली होती. राज्यात नव्याने मंजुरी दिलेल्या क्षेत्रांत मुंबई, भद्रावती, चंद्रपूर, घुग्घुस, मलकापूर, राजुरा, उर्से, वाघोदा, वारुड आणि यवतमाळमधील २२ ठिकाणांचा समावेश आहे.
डीजीसीएच्या नियमानुसार एनपीएनटीअंतर्गत प्रत्येक दूरस्थ संचलित विमानाला (नॅनो वगळता) संचलनापूर्वी डिजिटल स्काई प्लॅटफॉर्मद्वारे परवानगी मिळवावी लागेल. वापरकर्त्यांना राष्ट्रीय मानवरहित वाहतूक व्यवस्थापनासाठी असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिवाय डिजिटल स्काई पोर्टल किंवा अॅपद्वारे उड्डाणाची वेळ आणि स्थान सूचित करणे आवश्यक आहे.
हरित क्षेत्रांमध्ये ड्रोन उडविणाऱ्यांना मानवरहित विमानप्रणाली (यूएस) २०२१ आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे.
..........................................