गणेश मंडळांना आजपासून परवानगी, हमीपत्र बंधनकारक; पोलीस परवानगीची गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:48 AM2020-07-10T02:48:54+5:302020-07-10T07:55:04+5:30
आॅनलाइन अर्जासाठी शुक्रवारपासून प्रक्रिया सुरू होत आहे. कोरोनाचे संकट असल्याने मंडळांना काळजी घेणारे विशेष हमीपत्र देणे बंधनकारक असणार आहे.
मुंबई - मूर्तिकारांपाठोपाठ आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी महापालिका आॅनलाइन परवानगी देणार आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या परवानगीच्या आधाराने यंदा मंजुरी मिळणार आहे. मंडळांना पोलीस आणि अग्निशमन दलाकडे परवानगीसाठी जावे लागणार नाही. आॅनलाइन अर्जासाठी शुक्रवारपासून प्रक्रिया सुरू होत आहे. कोरोनाचे संकट असल्याने मंडळांना काळजी घेणारे विशेष हमीपत्र देणे बंधनकारक असणार आहे.
मूर्तिकारांना दरवर्षी मंडप बांधण्याची परवानगी मे महिन्यातच मिळत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने परवानगी देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. गुरुवारपासून सर्व मूर्तिकारांना मंडपासाठी आॅनलाइन परवानगी देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया दरवर्षी जून महिन्यात सुरू होते. परंतु, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील सर्व यंत्रणा व्यस्त असल्याने या प्रक्रियेलाही विलंब झाला. गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडे १९ आॅगस्टपर्यंत सायं. ५.३० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
येथे असा करा अर्ज
महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये अर्ज उपलब्ध आहेत. यामध्ये - कार्यपद्धती - पालिका पोर्टलवरील - आॅनलाइन सेवा - परीरक्षण - गणपती/नवरात्री टॅबखाली गणपती/नवरात्री मंडप अॅप्लिकेशनमध्ये नमूद करण्यात आलेल्या लिंकनुसार अर्ज सादर करता येतील. तसेच अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबंधित सहायक आयुक्तांशी संपर्क करावा.