पुढील तीन दिवसांत गणेश मंडपांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:32 AM2018-08-24T01:32:18+5:302018-08-24T01:32:46+5:30
आॅनलाइन अर्जाचे विघ्न दूर करून येत्या तीन दिवसांत या प्रक्रियेला वेग देण्याची हमी पालिका प्रशासनाने आज दिली
मुंबई : येत्या रविवारी सुट्टीच्या दिवशी बहुतांशी गणेश मंडळे गणेशमूर्ती आणणार आहेत. मात्र मंडपाची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. आॅनलाइन अर्जाचे हे विघ्न दूर करून येत्या तीन दिवसांत या प्रक्रियेला वेग देण्याची हमी पालिका प्रशासनाने आज दिली. यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने या वर्षीपासून आॅनलाइन पद्धत सुरू केली. मात्र तांत्रिक अडचण व पालिकेच्या संथ कारभारामुळे आतापर्यंत १४६३ पैकी केवळ ४२७ मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे हवालदिल झालेल्या गणेशोत्सव मंडळांनी अर्जाची मुदत वाढवून मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले गाºहाणे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यापुढे आज मांडले. येत्या तीन दिवसांत उर्वरित मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे महापौर दालनात झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गणपती आगमनाआधी खड्डेमुक्ती
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बुजवलेले खड्डेही पुन्हा उखडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना दिली आहे. खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. मात्र अद्याप मंडपाची परवानगी नसल्याने गणेशमूर्ती ठेवायची कुठे व सजावट, देखावे उभारायचे कधी, असा पेच मंडळांसमोर आहे. याबाबत गुरुवारी महापौरांसोबत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या तीन दिवसांत उर्वरित परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
१४६३ मंडळांपैकी ११३२ मंडळांचे अर्ज महापालिकेकडे आले आहेत. ५२७ मंडळांना मंडपाची परवानगी मिळाली आहे.