लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागल्याने, सार्वजनिक मंडळाचे आर्थिक गणित बिघडले होते. मात्र, या वर्षी गणेशोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्याची परवानगी महापालिकेने अखेर दिली आहे. याबाबतचे नवीन निकष जाहीर करण्यात आले आहेत.
दरवर्षी गणेशोत्सव मुंबईत धूमधडाक्यात साजरा केला जातो. अनेक छोटी-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यावसायिक जाहिरात मिळवून हा उत्सव साजरा करीत असतात. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यावेळी नियमानुसार जाहिरात, वर्गणी, देणगी यावर मर्यादा आल्या होत्या. याचा मोठा फटका बहुतांशी सार्वजनिक मंडळांना बसला होता.
कोविडचे सावट असल्याने गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संख्येत घट झाली. मात्र, सार्वजनिक मंडळांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी व्यावसायिक जाहिरातीला परवानगी देण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिकेकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. हाच निकष नवरात्रौत्सव मंडळांना ही लागू असणार आहे.
असे असेल शुल्क....
मंडपाचा प्रवेशद्वारापासून शंभर मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी प्रति प्रवेशद्वार शंभर रुपये आकारण्यात येणार आहेत, तर शंभर मीटर अंतराबाहेर एका प्रवेशद्वारावर एक हजार रुपये शुल्क पालिकेमार्फत आकारण्यात येणार आहे.
गणेशोत्सव मंडळांना जाहिराती घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी आता मंजूर झाली आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
- ॲड.नरेश दहिबावकर (अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती)