राजकीय बॅनर्स, पोस्टर्ससाठी परवानगी बंधनकारकच; जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:29 PM2024-10-17T14:29:10+5:302024-10-17T14:32:20+5:30
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून पालिकेकडून मतदानाचे प्रमाण वाढावे, पालिका हद्दीतील अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विद्रुपीकरण कायदा १९९५ नुसार सर्व बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर, जाहिरात फलक आदी तात्काळ काढण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली असून सर्व राजकीय पक्षांनी यामध्ये सहकार्य करावे. ज्या ठिकाणी नियमानुसार परवानगी आहे, त्या ठिकाणी विहित पद्धतीने परवानगी घेतल्यानंतरच राजकीय पक्षांनी बॅनर्स, पोस्टर्स लावणे अपेक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून पालिकेकडून मतदानाचे प्रमाण वाढावे, पालिका हद्दीतील अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
‘सहकार्य गरजेचे’
- निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे गगराणी यांनी सांगितले.
- राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सूचनांचे पालन करा!
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार व सूचना जाणून घेतल्यानंतर खर्च मर्यादा आणि निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे, छपाई करावयाच्या पोस्टर्स, बॅनर्स आदींबाबत तरतुदी, मतदानाची गोपनीयता ठेवण्यासंदर्भात तरतूद या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गगराणी यांनी केले.
तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या
- लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.
- या प्रक्रियेनंतर ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये वाढ आणि बदल झाले आहेत, त्या सर्व ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे प्रत्येक कुटुंब आणि मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती लेखी स्वरूपात पोहोचवत आहेत.
- आपले मतदान केंद्र जाणून घ्या अर्थात ‘नो युअर पोलिंग स्टेशन’ ही मोहीम व्यापक स्तरावर राबवली जात आहे.
- राजकीय पक्षांनीही आपापल्या स्तरावर याबाबत खात्री करावी. बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती करून घ्यावी आणि
मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती पोहोचवून सहकार्य करावे, असे आवाहन गगराणी यांनी केले.