लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाशी संबधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवला होता, त्याला मंजुरी मिळाली.
शिक्षकांना ऑनलाइन रेल्वे पास वितरित करण्यात येणार आहे. यासाठीची लिंक दहावी संबंधित सर्व शिक्षकांना देण्यात येणार असून या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक हे काम पाहणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
दहावीचा निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाशी संबंधित कामासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा व नवी मुंबई आणि पनवेल अशा ठिकाणी राहतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त असून प्रवासातील दगदगीमुळे त्यांची कुचंबणा होत होती. या सगळ्या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. इतर शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार नसल्याने आम्ही याचा निषेध करत असल्याची भूमिका शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांनी मांडली.
शाळांतील ५० टक्के उपस्थिती मागे घ्या
नवीन शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावी, बारावीच्या शिक्षकांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासाची मुभा जर फक्त दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षकांना असेल तर इतर वर्गांच्या शिक्षकांनी आपली उपस्थिती कशी लावायची? प्रवास कसा करायचा असा प्रश्न शिक्षक करत आहेत. उपस्थिती बंधनकारक असल्याने खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या शिक्षकांना रोज २ ते ३ हजार खर्च करावा लागत असून, यामध्ये खासगी शाळेत अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांचे आर्थिक नुकसान होत आहेत. दहावी बारावी वगळता इतर वर्गांचे शिक्षक घरून ऑनलाइन शिक्षण देऊ शकत असल्याने सद्य:स्थितीत सर्व शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होम करून द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
कोट
दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतरांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली असली तरी ही किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील मग रेल्वेपास ऑनलाइन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे वितरित करेल यात अनेक दिवस जातील त्यापेक्षा शाळेच्या ओळख पत्रावर पास देण्यात यावा.
अनिल बोरनारे, भाजप शिक्षक आघाडी