मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १३.३६ हेक्टरवर पसरलेल्या ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ने परवानगी दिल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लि. (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हा अंदाजे सात तासांचा प्रवास तीन तासांत होणार आहे. या प्रकल्पासाठी ५० हजारांहून अधिक खारफुटी तोडण्याची परवानगी मिळावी, यासाठी रेल कॉर्पोरेशनने एमसीझेडएमएकडे अर्ज केला होता.मात्र, एमसीझेडएमएनेत्यांचा अर्ज फेटाळला. एमसीझेडएमएच्या या निर्णयाला रेल कॉर्पोरेशनने उच्च यायालयात आव्हान दिले.दरम्यान, एमसीझेडएमएने ६ मार्च रोजी त्यांचा अर्ज मंजूर करीत पुढील परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडे (एमओईएफ) प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे रेल कॉर्पोरेशनला कळविण्यात आले.508 कि.मी. लांब मार्गिका असलेल्या बुलेट प्रकल्पाची १५५.६४२ कि.मी. मार्गिका महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यापैकी १३१.३० हेक्टरवर खारफुटी पसरल्या आहेत. या प्रकल्पामुळे या खारफुटींची कत्तल करण्यात येणार आहे.‘पाचपट अधिक खारफुटी लावणार’एमसीझेडएमएने रेल कॉर्पोरेशनला पाठविलेल्या पत्रानुसार, एमओईएफच्या कोस्टल झोन रेग्युलेशन्सनुसार, ज्या खारफुटी तोडण्यात येणार आहेत, त्या बदल्यात ठाणे व मुंबईत खारफुटी लावण्यात याव्यात. तर, तोडण्यात येणाऱ्या खारफुटींपेक्षा पाचपट अधिक खारफुटी लावण्यात येतील. कायद्यात केवळ तीनपट अधिक खारफुटी लावण्याची तरतूद आहे, असा युक्तिवाद रेल कॉर्पोरेशनचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी न्यायालयात केला. बुलेट ट्रेन हा जनहितार्थ प्रकल्प आहे, हे एमसीझेडएमएने रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव फेटाळताना विचारात घेतले नाही, असेही परांजपे यांनी न्यायालयाला सांगितले.