मुंबई, पुणे वगळता अन्यत्र  एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 06:53 PM2020-05-03T18:53:20+5:302020-05-03T18:53:59+5:30

मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

Permission to start single shops except Mumbai, Pune | मुंबई, पुणे वगळता अन्यत्र  एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

मुंबई, पुणे वगळता अन्यत्र  एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

Next

 

मुंबई :  मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने असा आहे.  कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील. 

यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई  महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. त्याशिवाय कोविड 19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत देताना ती दुकाने कंटेन्टमेंट झोनमध्ये नसतील. यात मद्याच्या दुकानांना हाच नियम लागू असेल. 

नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच (इन सिटू) राहण्याची सोय असणे बंधनकारक असणार आहे.  कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविल्यानंतर काल राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, मुंबई व पुणे प्रदेशात कोरोनाचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसल्यामुळे तेथील सवलतींवर मर्यादा घालाव्या लागत आहेत. मुंबई प्रदेशातील महानगरपालिका (एमएमआर रिजन), पुणे, पिंपरी चिंचवड व मालेगाव महानगरपालिका हद्दी या रेडझोनमध्ये येत असून येथील उद्योग सुरू करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. तसेच या झोनमध्ये खासगी कार्यालयेही बंदच राहणार आहेत. मात्र, या व्यक्तिरिक्त असलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अटींवर खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Permission to start single shops except Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.